Goodbye 2022: डिसेंबर महिना सुरु झाला की प्रत्येकाला नव्या वर्षाची चाहूल लागते. 2023 च्या आगमानाला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 2022 वर्ष अनेक चांगल्या, वाईट गोष्टींनी आठवणीत राहिल. क्रीडा क्षेत्रापासून राजकारणापर्यंत वर्षभरात अनेक घडमोडी घडल्या. कॉमनेवेल्थ सामन्यात भारतीय संघानं दमदार कामगिरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाली, काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळाला, त्याशिवाय अनेक मोठ्या घडामोडी 2022 या वर्षात घडल्या. 2022 या वर्षात घडलेल्या राजकीय दहा घटनांचा आढवा याबातमीतून घेणार आहोत. पाहूयात 2022 या वर्षात देशाच्या राजकारणात घडलेल्या मोठ्या दहा घडामोडी -


पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक -


2022 च्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आले होते. पाच जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी फिरोजपूरमध्ये शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवला होता. चिंताजनक म्हणजे त्या ठिकाणावरुन पाकिस्तान बॉर्डर फक्त 20 किमी दूर आहे. माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील कमेटीनं या घटनेसाठी पिरोजपूर एसएसपी ला जबाबदार ठरवले.


काँग्रेसला नवा अध्यक्ष 


24 वर्षानंतर गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला मिळाला. सीताराम केसरी यांच्यानंतर पहिल्यांदाच हे पद गांधी कुटुंबाहेर गेलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान पार पडलं. तब्बल 22 वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी ही निवडणूक पार पडत होती. त्यामध्ये एकूण 9,385 मतदान झालं. काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांना 7,897 मतं मिळाली, तर शशी थरूर यांना 1072 मतं मिळाली. 416 मतं अवैध ठरली आहेत. 



भारत जोडो यात्रा -


काँग्रेसनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत ही यात्रा सुरु आहे. 150 दिवसांपर्यंत ही यात्रा चालणार असून 12 राज्यातून आणि दोन केंद्र शासित प्रदेशातून जाणार आहे. तीन हजार 500 किमी प्रवास या यात्रेचा होणार आहे.  


युपी, उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता -


उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली. उत्तराखंडमध्ये प्रत्येक पाच वर्षाला सरकार बदलते, हा इतिहास भाजपने मोडला. त्याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या नेतृत्वात भाजपने यश मिळवले.  



पंजाबमध्ये आपची सत्ता -


उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसोबत पंजाबमध्येही यंदा विधानसभा निवडणूक झाली होती. पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आप पक्षाने भाजपसह इतर पक्षांचा सुपडा साफ केला. दिल्लीनंतर आपने पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली.  पंजाबमधील विजयाने केजरीवाल यांना राष्ट्रीय नेता म्हणून ओळख मिळाली. 


 
उद्धव ठाकरेंचा राजीनामा -


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. पक्षाताली बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागले. शिवसेना पक्षातील 40 आमदार आणि 12 खासदारांनी वेगळा गट तयार करत उद्धव ठाकरेंना धक्का दिला. शिवसेना कुणाची? हा वाद सध्या कोर्टात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात सर्वात जास्त हा विषय चर्चेत राहिलाय. 


महाराष्ट्रात शिंदे सरकार -


एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांच्या साथीनं शिवसेनेतून फारकत घेतली. 40 आमदारांना सोबत घेत शिंदेंनी गुजरातमार्गे सुरत गुवाहाटी गाठले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात परत येत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार अशी घोषणा केली अन् महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस सत्तेतून बाहेर राहणार होते, पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावरुन फडणवीस यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला होता. 



नूपुर शर्मांच्या वक्तव्यानंतर वाद -


भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वक्तव्य करत वाद ओढावून घेतला. शर्मा यांना त्यानंतर पक्षातून निलंबीत करण्यात आले. नुपूर शर्मांच्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद जगभरात उमटले.  नुपूर शर्मा यांना देशाच्या सुप्रीम कोर्टानेही फटकारल्याचं दिसून आलं. ज्ञानवापी प्रकरणावर बोलताना नुपूर यांनी टीव्हीवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात आंदोलने झाली होती. 


पीएफआयवर बंदी- 


कट्टरपंथी मुस्लिम संगटना PFI वर केंद्र सरकारने बंदी घातली. पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. त्यावर गृहमंत्रालयाने अध्यादेश काढत बंदी घातली


मुलायम सिंह यांचं निधन- 


समाजवादी राजकारणातील सर्वांत मोठा आधारस्तंभ आणि युपीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले 'धरतीपुत्र' मुलायम सिंह यादव यांचे 10 ऑक्टोबर रोजी निधन झालं. मुलायम सिंह यादव यांनी 1992 मध्ये समाजवादी पार्टीची स्थापना केली होती. मुलायम सिंह 10 वेळा आमदार सात वेळा खासदार राहिलेत.