Wrestlers Protest:  गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाच्या (Wrestler Protest) चर्चांना आज बजरंग पुनियाने अखेर पूर्णविराम दिला आहे. 'आमचे आंदोलन असेच सुरु राहिल' असे ट्विट बजरंग पुनियाने केले आहे. जंतर मंतर या ठिकाणी  जवळपास महिनाभरापासून भारतीय कुस्तीपटूंनी न्याय मिळवण्यासाठी लढा उभारला आहे. भाजपचे खासदार आणि कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप काही महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटूंकडून करण्यात येत आहे. 


बजरंग पुनियाचे ट्विट नेमकं काय?


कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी आंदोलनातून माघार घेतल्याचा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. या संपूर्ण चर्चांवर बजरंग पुनियाची प्रतिक्रिया समोर आली आहे. बजरंग पुनियाने ट्विट करत सुरु असणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बजरंग पुनियाने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आंदोलन मागे घेण्याच्या सर्व बातम्या या खोट्या आहेत. आम्हाला नुकसान पोहचवण्यासाठी हे सर्व केले जात आहे. पण आम्ही मागे हटलो नाही आणि आंदोलन देखील मागे घेतले नाही. तसेच महिला कुस्तीपटूंनी एफआयआर मागे घेतल्याच्या देखील चर्चा या खोट्या आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरु राहिल.' असेही त्याने म्हटले. 






गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू 


अनेक सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू यांनी कुस्तीपटूंच्या या आंदोलनाचे समर्थन केले आहे. तर अनेक लोकांनी या गोष्टीचा विरोध देखील केला आहे. पण तरीही कुस्तीपटूंनी माघार घेतली नाही. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळेस झालेल्या प्रकरणामुळे दिल्ली पोलिसांवर अनेक ताशेरे ओढण्यात आले. भारतीय खेळाडूंना देण्यात आलेल्या या वागणुकीमुळे संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. तर कुस्तीपटूंनी त्यांची सर्व पदकं गंगा नदीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर शेतकरी नेते नरेश टिकेत यांनी समजूत काढल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.