मुंबई : देशात महागाईचा भडका उडाला आहे. यात सर्वसामान्य नागरिक अक्षरश: होरपळून जात आहेत. किरकोळ महागाई दर 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर एप्रिल 2022 मध्ये घाऊक महागाईनेही नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, घाऊक महागाईचा दर गेल्या महिन्यात 15.08 टक्के होता. एक वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये घाऊक महागाईचा दर 10.74 टक्के होता. या वाढीसह घाऊक महागाई दर नऊ वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. इंधन आणि ऊर्जा घाऊक महागाई दर 34.52 टक्क्यांवरुन 38.66 टक्के तर अन्न धान्य महागाई दर 8.71 टक्क्यांवरुन 8.88 टक्के झाला आहे.
डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) ने आज (17 मे) एप्रिल महिन्यातील घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. डीपीआयआयटीने सांगितले की, तेल आणि इंधनाच्या किमती वाढल्यामुळे एप्रिलमध्ये घाऊक महागाई वाढली आहे. एप्रिलमध्ये घाऊक किमतींवर आधारित चलनवाढ 15.5 टक्क्यांच्या आसपास असू शकते, असं भाकित विश्लेषकांनी केलं होतं. ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल हा सलग तेरावा महिना आहे, ज्यात घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या वर आहे. यापूर्वी मार्च महिन्यात घाऊक महागाईचा दर 14.55टक्के होता.
DPIIT ने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, "खनिज तेले, मूलभूत धातू, कच्चे तेल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, उपभोग्य वस्तू, अ-खाद्य वस्तू, अन्न उत्पादने आणि रसायने आणि रासायनिक उत्पादनांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने एप्रिल 2022 मध्ये घाऊक महागाईचा दर उच्च स्तरावर पोहोचला आहे. या सर्व वस्तूंच्या किमती गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत लक्षणीय वाढल्या आहेत."
आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 8.35 टक्के होता, जो मार्चमध्ये 8.06 टक्के होता. त्याचप्रमाणे, इंधन आणि वीज बास्केटमधील घाऊक महागाईचा दर मार्चमधील 34.52 टक्क्यांच्या तुलनेत 38.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्पादित वस्तूंच्या बाबतीत महागाईचा दर किंचित वाढला आहे. मार्चमध्ये तो 10.71 टक्के होता, जो एप्रिलमध्ये 10.85 टक्के झाला.
यापूर्वी, सरकारने गेल्या आठवड्यात किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली होती. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 7.8 टक्के होता, जो मे 2014 नंतरचा सर्वोच्च आहे. वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेला या महिन्याच्या सुरुवातीला एमपीसीची बैठक घेऊन रेपो दरात अचानक वाढ करावी लागली. रिझव्र्ह बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ करताना हे मान्य केलं होतं की, येत्या काही महिन्यांत महागाईच्या उच्च दरातून सर्वसामान्यांची सुटका होणार नाही, याचाच अर्थ सामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्याच लागतील.