World Music Day 2021 : प्रत्येकाच्या जीवनात संगीताचं एक विशेष स्थान आहे. आयुष्याच्या छोट्या छोट्या प्रसंगात संगीत आपल्या सोबत असतं. आनंद असो की दु:ख, प्रेम, मज्जा-मस्ती अशा प्रत्येकवेळी आपण त्या त्या पद्धतीचं संगीत ऐकतो आणि ते एन्जॉय करतो. जगभरात संगीताला एक असाधारण महत्त्व आहे. संगीत आपल्या जीवनात बरेच रंग भरते. जगभरात आजच्या दिवशी म्हणजेच 21 हा वर्ल्ड म्युझिक डे म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस संगीतकार आणि गायकांचा सन्मान तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात संगीताचा होणारा प्रभाव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो.


जागतिक संगीत दिन 'Fete de la Musique' म्हणून देखील ओळखला जातो. नवोदित तरुण आणि व्यावसायिक संगीतकारांची कला पुढे आणण्याचे उद्दीष्ट देखील यामध्ये ठेवले आहे. जगातील 120 हून अधिक देश 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा करतात. या दिवशी उद्याने, स्टेडियम आणि इतर सार्वजनिक ठिकाणी विनामूल्य पब्लिक कॉन्सर्ट आयोजित केले जातात. हा खास दिवस साजरा करण्यासाठी संगीत चाहते म्युझिकल कॉन्सर्ट आणि इतर अनेक कार्यक्रम आयोजित करतात.


परंतु, यावर्षी कोरोना साथीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बहुतेक कार्यक्रम व्हर्च्युअल आणि डिजिटल माध्यमातून आयोजित केले जात आहेत. या निमित्ताने अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मुझिक कॉन्सर्ट, स्पर्धा आणि म्युझिक फेस्ट आयोजित केले जात आहेत.


वर्ल्ड म्युझिक डेचा इतिहास


फ्रान्समध्ये 1982 मध्ये प्रथम जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी फ्रेंच सरकारमधील कला व सांस्कृतिक मंत्री जॅक लाँग आणि मॉरिस फ्लेरेट यांनी पॅरिसमध्ये 'fete de la musique' सुरू केले. मॉरिस फ्लेरेस्ट एक संगीतकार होते, शिवाय म्युझिक जर्नलिस्टही होते, तसेच ते रेडियो प्रोड्युसरही राहिले होते, त्यामुळे त्यांच्या आवडीनुसार या म्युझिक डेच्या सुरुवातीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला. 


वर्ल्ड म्युझिक डेचे महत्त्व


आपल्या जीवनात संगीताचे महत्त्व आणि ते आपल्या मनासाठी आणि शरीरासाठी कसे फायदेशीर आहे याबद्दल सांगण्यासाठी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. बर्‍याच तज्ञांचा असा विश्वास आहे की संगीतामुळे आपल्या जीवनात तणाव कमी होतो आणि चांगली झोप मिळण्यास मदत होते. यासह,  आपल्या जीवनशैलीमध्ये संगीताचा समावेश करणारे लोक त्यांच्या कामावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतात, असंही बोललं जातं.