मुंबई: आजकाल शिव्या देणं खूपच कॉमन झालं आहे. आधी या शिव्या केवळ पुरुषांच्या वा मुलांच्या तोंडी असायच्या, एखाद्या मुलीच्या तोंडी शिवी आली तर ते असभ्यपणाचं लक्षण समजलं जायचं. पण आता यामध्ये कोणताही भेदभाव राहिला नसून मुलीही तिचक्याच सहजतेने त्यांच्या संभाषणामध्ये शिव्यांचा वापर करताना दिसत आहेत. 


जगप्रसिद्ध लेखिका अॅंजेला कार्टर ही म्हणते की, कोणतीही भाषा ही त्या संस्कृतीची शक्ती असते, भाषा हे वर्चस्ववादाचं किंवा स्वातंत्र्याचं माध्यम असतं. आपली भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ते आपल्या संस्कृतीचं किंवा व्यक्तीमत्वाचं प्रतिबिंब असतं. 


सगळ्या शिव्या महिलांच्या संदर्भातच का? 


वेश्या हा शब्द ऐकल्यावर देहविक्री करण्याऱ्या एखाद्या महिलेचं चित्र आपल्यासमोर येतं. पण या क्षेत्रात मेल सेक्स वर्कर्स देखील असतात. पण वेश्या या शब्दाच्या तुलनेत त्या पुरुषांना कोणताही पर्यायी शब्द सापडत नाही. जगभरातल्या अनेक भाषांमध्ये महिलांना उद्देशून देण्यात येणाऱ्या अनेक शिव्यांना पुरुषांच्या संदर्भात कोणताही पर्यायी शब्द नसतो. 


आपल्याकडे काहीही झालं तरी एखाद्याला आईवरुन शिवी हासडण्यात येते. तुझ्या आxx, चुXX, मादxxx, भेंxx, भोxxx किंवा रांxx... या सगळ्या शिव्या ऐकल्या तर एकच लक्षात येतं की त्या केवळ महिलांच्या संदर्भात आहेत. या शिव्यांवरुन आपल्या समाजव्यवस्थेचं चित्र समोर येतं. 


महिला या घरची प्रतिष्ठा, त्यामुळे... 


भारतीय संस्कृतीमध्ये मुलींच्या जन्माला महत्व दिलं जातं. मुलीच्या जन्मानंतर आपल्या घरी लक्ष्मी आली असं म्हटलं जातं. मुली आणि महिलांना घरच्या अब्रू, सन्मानाशी जोडलं जातं. त्यामुळे भारतीय समाजव्यवस्था आपल्या घरातील महिलांच्या प्रतिष्ठेप्रती अत्यंत संवेदनशील असल्याचं दिसून येतं. 


त्यामुळेच एखाद्याच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा असेल किंवा त्याच्या सन्मानाला ठेच पोहोचवायची असेल तर कोणत्याही भांडणात त्याला आईवरुन किंवा बहिणीवरुन शिव्या दिल्या जातात. 


शिव्या देणं हे पितृसत्ताक व्यवस्थेचं दर्शन 


एखाद्या व्यक्तीला त्याच्या आईवरुन किंवा त्या प्रकारच्या शिव्या देणं हे पितृसत्ताक व्यवस्थेचं दर्शन असल्याचं दिसून येतंय. आपण एवढा विकास केला तरी त्या मानसिकतेतून बाहेर येत नाही हेच यातून स्पष्ट होतंय. चुXX, मादxxx, भेंxx, भोxxx किंवा रांxx या प्रकारच्या शिव्या देणं म्हणजे स्त्रियांचा तिरस्कार करण्याची मानसिकता आहे. 


एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा असेल तिच्या चारित्र्यावर थेट हल्ला केला जातो. काहीच बोलण्यासारखं नसल्यास तिला चारित्र्यहीन ठरवलं जातंय. एखादं ऑब्जेक्ट म्हणून महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन यातून समोर येतोय. 


दोन मुलांच्या भांडणातही महिलांशी संबंधित शिव्या 


दोन पुरुषांचं किंवा मुलांचं भांडण जरी झालं तरी त्यामध्ये शिव्या मात्र महिलांच्या संदर्भात देण्यात येतात. आपल्या देशात महिलांप्रती भेदभाव केला जातोय, त्याचाच परिणाम म्हणजे महिलांच्या संदर्भात दिलेल्या शिव्यांना लाईटली घेतलं जातंय. फ्रस्ट्रेशन, राग किंवा ताण आल्यानंतर शिव्या दिल्यास तो राग, ताण काही प्रमाणात कमी होतो असं मानसोपचारांकडून सांगितलं जातं, पण समस्या ही नाही. शिव्या या एखाद्या महिलेला किंवा महिला समुदायाला समोर ठेऊन दिल्या जातात ही समस्या आहे. 


केवळ आपल्या आई-बहिणीचा सन्मान म्हणजे समानता नव्हे 


आजच्या काळात जर आपण लिंग समानतेविषयी बोलत असू, महिलांच्या अधिकारांविषयी बोलत असू तर त्यांच्या प्रतिष्ठेला किंवा सन्मानाला ठेच पोहोचवणाऱ्या या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. केवळ आपल्या आई, पत्नीचा सन्मान करणं, आपल्या मुलीला इतर मुलांच्या बरोबरीने अधिकार देणं, स्वातंत्र्य देणं म्हणजे महिला समानतेचं धोरण अंगिकारणं असं असू शकत नाही. तर महिलांचा आदर करणे, आणि तो आपल्या चालण्या-बोलण्यातून व्यक्त करणं.... आणि सर्वात म्हणजे महिलांच्या संबंधित शिव्या न देणं हे देखील स्वत:च्या आई-बहिण किंवा पत्नी-मुलीचा सन्मान करण्यासारखं आहे.  


काही वेळा असे प्रसंग घडतात की त्यावेळी आपसूकच आपल्या तोंडात शिव्या येतात. पण त्या लिंगविरहित असतील, कोणाच्या आई- बहिणीच्या किंवा महिला वर्गाच्या सन्मानाला ठेच न पोहोचवणाऱ्या असतील तर अधिक बरं.