PM Modi Addressing Labour Conference : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत श्रम मंत्रालाय 2047 साठी आपलं व्हिजन तयार करत आहे. यामध्ये कामातील लवचिकता हा महत्वाचा भाग असेल. भविष्यात त्यासाठी विविध योजना येण्याची शक्यता आहे. कामाच्या तासांची लवचिकता आणि कुठूनही काम करण्याची (घरुन, ऑफिसमधून अथवा इतर ठिकाणावरुन) लवचिकता भविष्यात गरजेची आहे. तसेच flexi work hours ही काळाची गरज असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. flexible work place सारख्या सुविधांचा वापर महिला कामगारांसाठी संधी म्हणून केला जाऊ शकतो. यंदा 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात नारीशक्तीच्या संपूर्ण सहभागाचं आवाहन केलेय, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील श्रम मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आंध्रप्रदेशात तिरूपती इथे, 25 आणि 26 ऑगस्ट रोजी, ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत, चार संकल्पनांवर आधारित सत्रे आहेत. कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी ई-श्रम पोर्टलवर सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी उपलब्ध करुन देण्याविषयी; राज्यसरकार संचालित ईएसआय रुग्णालयांच्या माध्यमातून चालवली जाणारी, ‘स्वास्थ्य से समृद्धी’ योजना आणि त्याची पीएमजन आरोग्य योजनेशी सांगड घालणे, चार कामगार संहितांच्या अंतर्गत नियम निश्चित कारणे; व्हीजन श्रमेव जयते @2047, या चार संकल्पनांसह, कामाची समान परिस्थिती, सर्व कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, यात असंघटित आणि प्लॅटफॉर्म वर काम करणारे कुली, लैंगिक समानता, अशा विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे.
गुलामगिरीच्या काळातले आणि गुलामगिरीच्या मानसिकतेचे दर्शन घडविणारे कायदे रद्द करण्यासाठी गेल्या आठ वर्षांत आमच्या सरकारने पुढाकार घेतला आहे,असे पंतप्रधानांनी सांगितले. "असे कामगार कायदे देश आता बदलत आहे, त्यात सुधारणा करत आहे, ते सुलभ करत आहे,"असे त्यांनी नमूद केले. "29 कामगार कायद्यांचे 4 सोप्या श्रम संहितांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे," असे ते म्हणाले. यामुळे किमान वेतन, नोकरीची सुरक्षा, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा याद्वारे कामगारांचे सक्षमीकरण याची सुनिश्चिती होईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.