मुंबई: सध्याच्या काळात घटनेने महिलांना समान अधिकार (Equality) दिले असले तरी खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी होत नाही. महिलांना अजूनही त्यांच्या अधिकारासाठी लढावं लागतंय. पण ही आपल्याच देशाची अवस्था आहे असं नाही. जगातल्या सर्वात जुन्या लोकशाही देशातही महिलांची अशीच अवस्था आहे. एक काळ असा होता की त्या देशात महिलांना संपत्तीचा आणि मतदानाचा अधिकार नाकारला गेला होता. त्याविरोधात महिलांनी मोठी चळवळ उभी केली आणि सरकारला ते अधिकार देण्यात भाग पाडलं. 26 ऑगस्ट 1920 साली महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला. याच दिवसाच्या स्मरणार्थ जगभरात 26 ऑगस्ट या दिवशी महिला समानता दिवस (Women's Equality Day) साजरा केला जातो. 


19 व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत महिलांना संपत्तीचा वा मतदानाचा कोणताही अधिकार नव्हता. कामाच्या ठिकाणी कोणतीही समानता नव्हती. महिलांना पुरुषांच्या तुलनेत अर्ध्या वेतनावर काम करावं लागायचं, पण काम मात्र तेवढंच करावं लागायचं. याविरोधात अमेरिकेतल्या महिला एकसंघ होऊ लागल्या. आपल्यालाही समान अधिकार हवेत अशी मागणी करत त्यांनी चळवळीला सुरुवात केली. 


20 व्या शतकाच्या सुरुवातीला न्यूझिलँड, फिनलँड आणि ब्रिटनमध्ये महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार देण्यात आला. त्यामुळे अमेरिकेतल्या महिलांच्या चळवळीला अधिक धार आली. अमेरिकेत 1876 साली घटनादुरुस्तीने महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करण्यात आला, पण त्याला मान्यता मिळण्यास अपयश आलं. 


पहिल्या महायुद्धाच्या काळात महिला चळवळीला गती


महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी सुरु केलेल्या चळवळीला पहिल्या महायुद्धाच्या काळात गती मिळाली. लोकशाहीच्या संरक्षणासाठी अमेरिकेने या युद्धात भाग घेतल्याचं अमेरिकन सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यावर आंदोलन करणाऱ्या महिला संघटनांनी टीका केली. जगभरातल्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढा देणारे अमेरिकन सरकार त्यांच्याच देशातील अर्ध्या लोकसंख्येला मूलभूत अधिकार नाकारत असून सरकारची ही भूमिका दुटप्पी असल्याची टीका करण्यात आली.


महिला चळवळीचा विजय


अमेरिकेतल्या महिलांना मतदानाचा अधिकार द्यायचा असेल तर दोन तृतियांश राज्यांच्या मान्यतेची गरज होती. म्हणजे 50 पैकी 36 राज्यांनी महिलांच्या अधिकारांना मान्यता दिल्यास ही घटनादुरुस्ती होणार होती. त्यावर अमेरिकेतल्या महिलांनी त्यांच्या चळवळीची तीव्रता वाढवली आणि सरकारवर मोठा दबाव निर्माण केला. त्याचा परिणाम म्हणजे 26 ऑगस्ट 1920 साली अमेरिकेतल्या महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. याच घटनेच्या स्मरणार्थ 26 ऑगस्ट हा महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो.