नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून (Central Government) लोकसभेत मंगळवार (19 सप्टेंबर) रोजी महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले आहे. या आरक्षणावरुन राजकीय वर्तुळात अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील महिला आरक्षण विधेयकावर (Women Reservation Bill) प्रतिक्रिया दिली आहे. संसदेत हे विधेयक मांडल्यानंतर त्यांनी म्हटलं की, 'हा एक असा निर्णय आहे ज्यामुळे महिलांना त्यांचे अधिकार मिळतील.' तर अमित शाह यांनी या निर्णयासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत देखील प्रतिक्रिया दिली. ट्वीट करत त्यांनी म्हटलं आहे की, 'पंतप्रधान मोदी यांनी मंगळवार (19 सप्टेंबर) रोजी भारताच्या सनातन संस्कृतीला अनुसरुन 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमंते तत्र देवता' हे देशाच्या लोकशाहीत लागू केले आहे. लोकसभेत मांडण्यात आलेले महिला आरक्षण विधेयक त्याचाच एक भाग आहे. यामुळे आपल्या देशातील नारी शक्तीला त्यांचे योग्य अधिकार मिळणार आहेत.
'महिला सक्षमीकरण ही सरकारची घोषणा नाही' - अमित शाह
पुढे बोलताना अमित शाह यांनी म्हटलं की, 'महिला नेतृत्व सक्षमीकरण' ही केवळ सरकारची घोषणा नाही, तर एक संकल्प आहे. तर देशातील महिला शक्तीला अधिकार देण्याचा मोदी सरकारचा हा निर्णय आगामी काळात विकसित आणि समृद्ध भारताच्या उभारणीचा मुख्य आधारस्तंभ बनेल.
'नारी शक्ती शिवाय आत्मनिर्भर भारताची निर्मिती अशक्य'
'धोरण असो की नेतृत्व, भारताच्या स्त्री शक्तीने हे सिद्ध केले आहे की त्या कोणत्याही क्षेत्रात कोणापेक्षा कमी नाहीत. मोदी सरकारचा असा विश्वास आहे की नारी शक्तीच्या पाठिंब्याशिवाय आत्मनिर्भर भारताची निर्मिती शक्य नाही', असं अमित शाह म्हणाले.
मंगळवारी (19 सप्टेंबर) रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन कायदा) संसदेत मांडले.