Women in the Armed Forces : पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची बुरसटलेली प्रथा आपल्या देशात होती. अठराव्या शतकात मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेच्या बाबतीत ही प्रथा मोडली आणि भारतात एक नवा इतिहास घडला. पतीच्या निधनानंतर पतीचे कार्य निढळाने पुढे चालवणार्‍या राणी लक्ष्मीबाई, सावित्रबाई फुले अशी अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. इतिहासातील या घटनांची जेव्हा वर्तमानात पुनरावृत्ती होते, तेव्हाच इतिहासाचा आदर्श लोकांसमोर ठेवला जातो. हाच आदर्श  पुन्हा निर्माण करतात लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्यासारख्या रणरागिणी...


 पतीच्या अंत्यविधीवेळीच जिने देशसेवेचा निश्चय केला, ती वीरपत्नी स्वाती महाडिक आज भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू  आहेत.  पतीच्या पार्थिवावर देशसेवेचा निर्धार जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना, सह्याद्रीचा वीरपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. अतिरेक्यांना टिपून मारणाऱ्या संतोष महाडिक हे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडले. त्यांच्या पार्थिवावर पत्नी स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुलं आर्मीतच जातील, असा निर्धार केला.  खडतर प्रशिक्षण पूर्ण केले.


स्वाती महाडिक ही सुद्धा त्याच सौंदर्याचं एक मूर्तीमंत रुप होती. स्वातीनं स्वत:च्या निर्णयानं फक्त स्वत:चंच आयुष्य बदललं नाही तर. तिनं दृष्टीकोन बदलला आहे. साताऱ्यातल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातली सून नवरा गमावल्यानंतर त्याच्यासारखंच सीमेवर जायचं म्हणते. तेही पदरात दोन लहान पोरं असतांना. आपल्याकडे नवरा गमावलेल्या बाईला पाहतांना नजरेत कित्येक छटा असतात- सहानुभूतीच्या, संधीसाधूपणाच्या, शकुनअपशकुनाच्या. पण या सगळ्या नजरांना नजर देत स्वाती उभी राहिली. अवघ्या एका वर्षात ती लेफ्टनंट झाली. तिच्या सासूनं तर चक्क माझी सून विधवा नाही तर माझ्या मुलाला अमर करणारी म्हणून ती आजही सौभाग्यवतीच आहे असं अभिमानानं सांगितलं. एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीच्या स्त्रीत्वाचा केलेला हा सन्मान म्हणायला हवा. समाजाची मानसिकता बदलली पाहिजे असं आपण नुसतंच म्हणतो. पण, स्वातीनं त्याची सुरुवातच स्वत:पासून केली. 


स्वातीनं काय कमावलं याचं उत्तर शब्दात देणं खरंच अशक्य आहे. खरं तर स्वातीनं नाही आपण सगळ्यांनीच स्वातीच्या रुपात बरंच काही कमावलं आहे. या वीरपत्नीचा आदर्श केवळ महिलांच नव्हे तर पुरुषांसह साऱ्या समाजासमोरच अनुकरणीय ठरणार आहे. वाघिणीचे काळीज असणाऱ्या या जिगरबाज मर्दानीला- रणरागिणीला फक्त सलामच