Rakshabandhan 2022 : दोन वर्ष कोरोना काळातील महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. यावर्षी मात्र प्रत्येक सण मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. अशातच रक्षाबंधनाचा सण (11 डिसेंबर) जसजसा जवळ येत आहे तशी राखीची मागणीही वाढत आहे. कुणी आपल्या भावासाठी लांबून राखी पाठवत आहे तर काही आपल्या भावासाठी सर्वात सुंदर राखीच्या शोधात आहे. या दिवसांत राखीच्या दुकानात मात्र, ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. अशातच गुजरातमधील सुरत येथील एका दुकानात एक राखी लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहे. याला कारण आहे राखीची किंमत. सुंदर दिसणार्‍या या राखीची किंमत पाच लाख रुपये आहे.


सोन्या-चांदीपासून बनविलेल्या राख्या सगळ्यांनाच भुरळ घालतात


सुरतच्या या दुकानात देशातील सर्वात महागडी राखी तयार करण्यात आली आहे. या राखीची किंमत तब्बल 5 लाख रूपये आहे. राखीची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, पण हे खरे आहे. या दुकानात धाग्यापासून बनवलेल्या राख्या ते सोने, चांदी, प्लॅटिनम ते डायमंडने जडलेल्या सर्व प्रकारच्या राख्या मिळत असून लोक या राख्यांच्या सौंदर्याचे आणि डिझाइनचे कौतुक करत आहेत. तर, 5 लाखांच्या राखीने मात्र, सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 


पूर्वी रक्षाबंधनाच्या सणाला फक्त बहिणीच भावांच्या मनगटावर रेशमी धाग्याची राखी बांधत असत. अजूनही ग्रामीण भागात ही प्रथा कायम आहे. मात्र शहरी भागात सणाचं महत्त्व, त्यातील प्रथा काळानुसार बदलत चालल्या आहेत. रेशमी धाग्याची जागा आता कार्टूनच्या राख्या, नायलॉनच्या राख्या तसेच वेगवेगळ्या डिझाईनर राख्यांनी घेतली आहे. 


ज्वेलरी शॉपचे मालक म्हणाले...


रक्षाबंधनाचा सण लक्षात घेऊन गुजरातमधील सुरतमध्ये देशातील सर्वात महागडी राखी तयार करण्यात आली आहे. ज्वेलरी शॉपचे मालक दीपक भाई चोक्सी यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, "आम्ही तयार केलेल्या राख्या रक्षाबंधनानंतर ज्वेलरी म्हणूनही घातल्या जाऊ शकतात. आम्ही दरवर्षी हा पवित्र सण नवीन पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो."


सिमरन सिंग या स्थानिक ग्राहकाने सांगितले की, “सूरतमधील या दागिन्यांच्या शोरूममध्ये सोने, चांदी आणि प्लॅटिनमपासून विविध प्रकारच्या राख्या बनवल्या आहेत. या शोरूममध्ये रक्षाबंधनाच्या सणासाठी 400 रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या राख्या तयार करण्यात आल्या असून सर्वच उत्कृष्ट आहेत.