मुंबई : सोशल मीडियावर खासकरुन ट्विटरवर जर तुम्ही नजर फिरवलीत तरी एक ट्रेण्ड प्रचंड वायरल होताना तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. हा ट्रेण्ड आहे #SareeTwitter .
इतर वेळी साडी इज सो टिपीकल म्हणणाऱ्या मुली याच साडीत सुंदर सुंदर फोटो या हॅशटॅगच्या नावाने अपलोड करताना पाहायला मिळत आहेत. फक्त सामान्य महिलाच नाही तर राजकारणी, समाजकारणी, सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्री या पारंपरिक पोशाखावरचं आपलं प्रेम ट्विटरवर व्यक्त करत आहेत.
पाहायला गेलं तर या ट्रेण्डची सुरुवात झाली सोमवार (15 जुलै) सकाळपासून. पण आतापर्यंत लाखो महिलांनी #SareeTwitter या हॅशटॅगचा वापर करुन आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना देखील आपला फोटो शेअर करण्याचा मोह आवरला नाही. प्रियांका यांनी त्यांच्या लग्नातला म्हणजेच 22 वर्षांपूर्वीचा साडीतला फोटो ट्वीट केला आहे.
तर नुकताच काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील "मला हा हॅशटॅग वापरण्याची संधी घालवायची नाही" म्हणत साडी नेसलेले आपले चार फोटो ट्वीट केले आहेत.
यासोबत भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा, अभिनेत्री रेणुका शहाणे, नगमा, दिव्या दत्ता, यामी गौतम, गुल पनाग यांसारख्या अनेकींनी आपलं साडीप्रेम ट्विटरवर पोस्टमार्फत व्यक्त केलं आहे. परदेशातील महिलाही यात मागे नाहीत.
या ट्रेण्डची सुरुवात झाली कशी?
या ट्रेण्डची सुरुवात न्यूयॉक टाईम्स या मासिकात छापलेल्या एका लेखानंतर झाली. या लेखामध्ये साडीची प्रतिष्ठा आणि इतिहासाबद्दल लिहिलं होतं. ‘२०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यावर साडीला खूप प्रमोट केलं जात आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारसी साडी विणकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत’, असा मजकूर या लेखात छापण्यात आला. या लेखातील साडीविषयीच्या तर्काने अनेकजण नाराज झाले आणि #SareeTwitter ची सुरुवात झाली.
हजारो वर्षांपासून आपल्याकडे साडी नेसण्याची परंपरा आहे. या साडीची रुपं बदलली तरी बाईच्या कपाटातील आणि मनातील एक खास कोपरा साडीसाठी कायम असतो. बाकी हॅशटॅग वगैरे काय सुरुच असतं.
राजकारण्यांपासून सामान्यांपर्यंत मोहात पाडणाऱ्या #SareeTwitter ची सुरुवात कशी झाली?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2019 03:21 PM (IST)
फक्त सामान्य महिलाच नाही तर राजकारणी, समाजकारणी, सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्री या पारंपरिक पोशाखावरचं आपलं प्रेम ट्विटरवर व्यक्त करत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -