PM Narendra Modi : बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प किंवा आता जो बायडेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या वेळी या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. या सर्वांशी संवाद साधताना एका महिलेची उपस्थिती नक्कीच होती. ही महिला केवळ पीएम मोदींबरोबरच उपस्थित नव्हती, तर या दिग्गजांना त्यांनी मोदींचा मुद्दाही समजावून सांगितला. इतकंच नाही तर ही महिला पंतप्रधान मोदींच्या सर्व विदेश दौऱ्यांमध्ये दिसल्या. गुरदीप कौर चावला असं या महिलेचे नाव आहे. गुरदीप कौर या सुप्रसिद्ध इंटरप्रिटर आहेत. त्या पंतप्रधानांच्या भाषणाचे भाषांतर करतात आणि सर्व दिग्गज राज्यप्रमुखांना तसेच सर्वोच्च नेत्यांना समजावून सांगतात.


कोण आहे गुरदीप चावला?


गुरदीप कौर चावला या भारतीय भाषा सेवा LLP च्या संचालक आहेत. भाषांतर (ट्रान्सलेशन) आणि इंटरप्रिटेशन या क्षेत्रात त्यांना 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. डिप्लोमॅटिक आणि कॉर्पोरेट विश्वाला त्या भाषांतर (ट्रान्सलेशन) आणि इंटरप्रिटेशन सेवा प्रदान करतात.


पीएम मोदींच्या भाषणाचे भाषांतर करतात


गुरदीप कौर चावला बऱ्याच काळापासून पंतप्रधान मोदींचे भाषण हिंदीतून इंग्रजीत भाषांतरीत करतायत. बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि आता जो बायडेन या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी पंतप्रधान मोदी यांची चर्चा झाली तेव्हा गुरदीप चावला तेथे उपस्थित होत्या. गुरदीप चावला जवळपास प्रत्येक परदेश दौऱ्यावर पंतप्रधानांबरोबर उपस्थित असतात.


यशस्वी उद्योजकांमध्ये गणले जाते


प्रसिद्ध अनुवादक गुरदीप कौर चावला या अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ, G20 शिखर परिषद, हवामान बदलावरील परिषद, आसियान तसेच अमेरिका-भारत धोरणात्मक आणि व्यावसायिक संवाद यासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काम केले आहे.


वयाच्या 21 व्या वर्षी करिअरची सुरुवात 


गुरदीप चावला यांनी 1990 मध्ये भारतीय संसदेत भाषा इंटरप्रिटर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हा त्यांचे वय अवघे 21 वर्ष होते. पण, 1996 मध्ये त्यांची भारतातील कारकीर्द अचानक संपुष्टात आली. पतीची बदली झाल्यानंतर त्या अमेरिकेला रवाना झाल्या.


मोठमोठ्या दिग्गज नेत्यांचा आवाज


2010 मध्ये, गुरदीप कौर यांना ओबामा टीमने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांच्या पहिल्या भारत भेटीवर भेटण्यासाठी आमंत्रित केले होते. 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील ओबामा यांचे भाषण त्यांनी इंटरप्रिट केले. आज त्या अमेरिका, कॅनडा आणि भारत यांच्यातील जवळजवळ सर्व हाय-प्रोफाइल राजकीय बैठकांमध्ये दिसतात. पंतप्रधान मोदी, ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि जस्टिन ट्रूडो यांच्यामागे सुद्धा त्यांचा खंबीर आवाज आहे.