लखनौ : आधार कार्ड आणि बँक खातं नसल्यामुळे महिलेला रुग्णालयाच्या गेटवरच प्रसूती करावी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे एका महिलेची हॉस्पिटलच्या गेटवरच प्रसूती झाली. तिच्याकडे आधार कार्ड आणि बँक खातं नसल्यामुळे तिला भरती करुन घेण्यास रुग्णालयाने नकार दिला.


शाहजंग येथील आरोग्य केंद्रातील ही घटना आहे. रुग्णालय प्रशासनच्या बेजबाबदार वागण्यामुळे महिलेला रुग्णालयाच्या गेटवरच प्रसूती करावी लागली. नवजात बाळ जवळपास एक तास तसंच जमिनीवर पडून होतं.



'जेव्हा आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा कर्मचाऱ्यांनी काही कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्र नसल्यामुळे त्यांनी भरती करुन घेण्यास नकार दिला. आम्ही रुग्णालयातून बाहेर पडलो तेव्हा प्रसूतीवेदना सुरु होत्या. पत्नीने अखेर रुग्णालयाच्या गेटवरच बाळाला जन्म दिला', अशी माहिती पतीने दिली.


रुग्णालयाच्या गेटवर प्रसूतीवेदनांनी कळवळणारी महिला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याचा दावा फोल ठरवत आहे. ही घटना सरकारचे मोठमोठे दावे फोल ठरवते’, असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे.

दरम्यान, 'डॉक्टरांनी महिलेला जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी महिलेने आपला एक नातेवाईक तिथे घेऊन जाईल असं सांगितलं. पण गेटवर पोहोचतात प्रसूती वेदना सुरु झाल्या. तिला तात्काळ रुग्णालयात आणण्यात आलं, ज्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. दोघेही आता सुरक्षित आहेत’, असा अजब दावा रुग्णालयाने केला आहे.