नवी दिल्ली: काँग्रेसचं हात हे निवडणूक चिन्ह रद्द करा अशी मागणी, भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत दिल्ली भाजपचे प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे.


निवडणुकी दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निवडणूक चिन्हाचं प्रदर्शन करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने काँग्रेसचं हात हे चिन्ह रद्द करावं, अशी मागणी उपाध्याय यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

उपाध्याय यांनी याबाबत सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांची भेट घेतली.

याप्रकरणी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा उभारावा लागला तरीही मागे हटणार नाही, असा पवित्रा उपाध्याय यांनी घेतला.

हाताचा पंजा हा मनुष्याच्या शरिराचा एक भाग आहे. त्यामुळे निवडणुकी दिवशी तो प्रचाराच्या हेतूने दाखवणं नियमाचं उल्लंघन आहे. तो एक प्रचाराचा भाग आहे, असं उपाध्याय यांचं म्हणणं आहे.