नवी दिल्ली : विवाहितेचा हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिला ज्या ठिकाणी राहत असेल तिथल्या पोलीस ठाण्यात जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल करु शकते, असा फैसला सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे. याप्रकरणी गेल्या सात वर्षांपासून सुप्रीम कोर्टात खटला सुरु होता. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या बेंचने आज (मंगळवार, 09 एप्रिल) याप्रकरणी निकाल दिला आहे.
कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरनुसार ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे, तो परिसर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करता येतो. गुन्हा जर एकापेक्षा अधिक ठिकाणी घडला असेल, तर गुन्हा घडलेल्या ठिकाणांपैकी कोणत्याही एका ठिकाणी गुन्हा दाखल करता येतो. हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिलेला तक्रार नोंदवण्यासाठी सासरचे घर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, तिथेच जाऊन तक्रार करावी लागत होती. परंतु आता त्याची गरज भासणार नाही.
याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटले आहे की, पीडित महिला कुठेही राहत असेल, माहेरी, कोणत्याही नातेवाईकाकडे अथवा स्वतंत्र राहत असेल तर ती राहत्या ठिकाणी जवळ जे पोलीस ठाणे असेल, तिथे जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार नोंदवू शकते.
अशा प्रकरणांमध्ये देशभरातल्या विविध न्यायालयांनी वेगवेगळे निकाल दिले होते. त्यामध्ये काही न्यायालयांनी म्हटले होते की, सासरच्या जाचाने त्रासलेली महिला जर माहेरी राहत असेल, तर तिथल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करु शकते. परंतु आता सुप्रीम कोर्टाने त्याहीपुढे जाऊन पीडित महिला कुठल्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करु शकते असा निकाल दिला आहे.
याप्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, हुंड्यासाठी अथवा इतर कारणांमुळे एखाद्या विवाहितेचा सासरी छळ होत असेल, या छळाला कंटाळून ती पीडित महिला सासर सोडून माहेरी अथवा इतर कोणत्याही ठिकाणी राहत असेल, तर केवळ तक्रार दाखल करण्याकरता तिला परत तिच्या सासरी येण्यासाठी आपण भाग पाडू शकत नाही. ती महिला जिथे राहत असेल तिथल्या पोलीस ठाण्यात ती तक्रार दाखल करु शकते.
हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिला कुठूनही तक्रार करु शकते : सुप्रीम कोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2019 05:56 PM (IST)
विवाहितेचा हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिला ज्या ठिकाणी राहत असेल तिथल्या पोलीस ठाण्यात जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल करु शकते, असा फैसला सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -