नवी दिल्ली : ईशान्य भारतातल्या दोन राज्यांमध्ये सीमावाद चांगलाच उफाळून आलाय. काल या वादाचा भडका उडाला, ज्यात दोन्ही राज्यांचे पोलीस, दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री एकमेकांसमोर उभे राहिल्याचं चित्र दिसलं. देशाच्या एकतेच्या दृष्टीनं हे चित्र चांगलं नाही. त्यामुळे या वादावर तोडगा निघणं महत्वाचं आहे. 


 आसाम आणि मिझोरम...ईशान्य भारतातल्या दोन राज्यांमधल्या सीमावादानं सध्या रौद्र रुप धारण केलंय. हा वाद तसा काही दशकं जुनाच..पण काल एका घटनेनं तणाव वाढला आणि त्यानंतर दगडफेक, गोळीबारात किमान 6 पोलीस शहीद तर 50 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत


 दोन राज्यांमधला सीमावाद हा देशाला नवा नाही. पण आसाममध्ये सध्या भाजपचं सरकार आहे. मिझोरममध्ये त्यांच्या मित्रपक्षाचं मिझो नॅशनल फ्रंटचं सरकार आहे आणि असं असतानाही दोन्ही राज्यांचे पोलीस एकमेकांसमोर उभे ठाकलेत. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीही काल एकमेकांशी ट्विटरवर जाहीरपणे भांडताना दिसत होते. 


विशेष म्हणजे अगदी दोन तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ईशान्य भारतात होते. त्यावेळी सर्व मुख्यमंत्र्यांची एकत्रित बैठक झाली. त्यात आसाम आणि मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्रितपणे स्टेजही शेअर केलं आणि दोन दिवसांत हा भडका उडाला. 


 मुळात आसाम आणि मिझोरममधला हा वाद काय आहे?



  • आसाम आणि मिझोरमध्ये हे पूर्वी एकाच राज्याचा भाग होते.

  •  तेव्हा मिझोरम हा आसामचा लुशाई हिल्स नावाचा एक जिल्हा होता  

  • 1972 मध्ये मिझोरम आधी केंद्रशासित प्रदेश आणि 1987 मध्ये राज्य म्हणून घोषित झालं 

  • तेव्हापासून काचर, कोलासिबसारख्या वादग्रस्त भागांवर दोन्ही राज्यांचा दावा कायम आहे 

  • काल याच वादग्रस्त भागावरचं अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न आसाम पोलिसांनी केला आणि त्यानंतर मिझोरमकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली 


 आसामचे जे पोलीस जखमी झालेत त्यात महाराष्ट्राचे आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांचाही समावेश आहे. काचर या वादग्रस्त जिल्ह्यात ते एसपी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पायाला गोळी लागली असून सध्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 
 आसाम आणि मिझोरम ही दोन्ही राज्यं भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी वसलेली आहेत. परकीय सीमा इथून काही अंतरावर आहेत. त्यामुळेच हा सीमावाद जास्त काळ धुमसणं देशाला परवडणारं नाहीय. केंद्रीय गृहमंत्रालय त्यावर तोडगा काढण्यात किती यशस्वी ठरतं हे महत्वाचं असेल.