Asian Games: दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) आणि बजरंग पुनिया (Bajrang Puniya) यांना आशियाई स्पर्धांच्या (Asian Games) चाचण्यांमध्ये देण्यात आलेल्या सवलतीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. दरम्यान भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अॅडहॉक समितीचे सदस्य भूपेंद्र सिंग बाजवा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटलं की, सवलत देण्याचे धोरण फार पूर्वीपासून आहे. तुम्हाला संकेस्थळावर याबाबत माहिती मिळेल. कोणत्याही प्रकारची दुखापत न होऊ देण्यासाठी तुम्ही चांगल्या खेळाडूंना सूट देऊ शकता असं निवड प्रक्रियेच्या नियमावलीमध्ये आहे. मागील आशियाई खेळांमध्येही काही खेळाडूंना सवलत देण्यात आली होती. 






याविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांनी काय म्हटलं?


हायकोर्टाच्या निर्णयानंतर पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियन अंतिम पंघाल म्हणाले की, 'आमच्यासोबत असं का होत नाही. आम्हालाही संधी मिळायला हवी. या लोकांनी आता पदकं आणली तर पुन्हा हे लोकं चांगले आहेत असं सांगण्यात येईल आणि आम्ही पुन्हा मागे पडू.' त्यामुळे हा आमच्यावर अन्याय होत आहे असा दावा देखील अंतिम पंघाल यांनी केला आहे. 


याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी काय म्हटलं?


विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना आशियाई स्पर्धांमध्ये थेट प्रवेश दिल्याच्या विरोधात अंतिम पंघाल आणि अंडर-23 आशियाई चॅम्पियन सुजित कलकल यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. 


सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलं की, 'फोगाट आणि पुनिया यांची निवड सवलतीच्या धोरणांनुसार झाली नाही. तसेच त्यांची निवड करताना एकही परदेशी तज्ञ नव्हता. त्याचप्रमाणे पुनिया आणि फोगाटची निवड  करण्याचा निर्णय मुख्य प्रशिक्षकाच्या शिफारशीशिवाय घेण्यात आला होता.'


पीटीआयच्या माहितीनुसार, भारतीय कुस्ती महासंघाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वजन श्रेणींमध्ये निवड चाचण्या आवश्यक आहेत. तसचे मुख्य प्रशिक्षक किंवा विदेशी तज्ञांच्या शिफारशीच्या आधारे चाचणीशिवाय ऑलिम्पिक किंवा जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेत्या आणि नामांकित खेळाडूंची थेट निवड करण्याचा अधिकार निवड समितीकडे आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण?


विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या संबंधित समितीने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला आहे. तर इतर कुस्तीपटूंना 22 आणि 23 जुलै रोजी निवड चाचणीद्वारे भारतीय संघात त्यांचे स्थान निश्चित करावे लागणार आहे. दरम्यान महिला कुस्तीपटूंवर लैंगिक शोषण केल्याप्रकणी बृजभूषण सिंह यांच्या अटकेसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे हे दोघेही प्रमुख चेहरे होते. 


हे ही वाचा : 


Manipur Violence: मणिपूर हिंसाचार: दोन महिलांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक, आतापर्यंत पाच अटकेत