India weather : देशातील विविध राज्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy rain) कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. त्यामुळं नागरिकांचं स्थलांतर करावं लागत आहे. विशेष उत्तर भारतात पावसानं थैमान घातलं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच गुजरात राज्यातही पावसामुळं अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे धरणे आणि नद्यांची पाणी पातळी धोकादायक स्थितीपर्यंत वाढली आहे. त्यामुळं काही गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि रहिवाशांची गैरसोय झाली.


नागरिकांच्या घरांसह बाजारपेठांमध्ये साचलं पाणी 


गुजरातमधील नवसारी आणि जुनागडमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. तिथं नागरिकांच्या घरांसह बाजारपेठांमध्ये पाणी साचलं आहे. अधिकाऱ्यांनी जनतेला सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. धरणात किंवा आसपासच्या भागात जाऊ नये आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीची माहिती द्यावी अशा सूचना देणअयात आल्या आहेत. 


या भागात पावसाची शक्यता


पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूह, मध्य प्रदेश, गुजरात, कोकण-गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीच्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच बिहार, हरियाणा, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 


उद्यापासून दिल्लीत पावसाचा जोर वाढणार


दिल्लीतही चांगला पाऊस झाला आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र, उद्यापासून (24 जुलैपासून) पावसाचा जोर थोडा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 25 ते 27 जुलै दरम्यान दमट उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळणार आहे. यासोबतच हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबरतापमानातही वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळं मोठं नुकसान 


हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळं राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. राज्याच्या अनेक भागात अजूनही पाऊस सुरूच आहे. या पावसाने कहर केला आहे. गेल्या काही वर्षांच्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर राज्यात आतापर्यंत सर्वाधिक नुकसान यावर्षी झालं आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या 28 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे 4985.68 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. 


पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 138 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 169 जण जखमी झाले आहेत. तर 12 जण अजूनही बेपत्ता आहेत. यातील पाच जण रस्ता अपघातात, सहा जण बुडाल्याने आणि एक जण ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे बेपत्ता आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Yavatmal Rain : यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अतिवृष्टी, नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतपिकांचे मोठं नुकसान