तिरुअनंतपुरम : मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी आपल्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान दिलं आहे. कोविडच्या यशस्वी हाताळणीबद्दल ज्या केके शैलजा यांचं जगभरात कौतुक झालं, त्यांना डावलून त्यांच्या जागी वीना जॉर्ज या नव्या चेहऱ्याला मंत्रिमंडळात संधी दिली. पी विजयन यांच्या या निर्णयावर केरळमधून तसेच देशभरातून अनेकांनी टीका केली आहे. कोविडच्या काळात अतिशय चांगलं काम करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना डावलून त्या ठिकाणी काम करण्याची संधी देण्यात आलेल्या वीना जॉर्ज आहेत तरी कोण हे पाहूया.


पत्रकार ते राजकारण असा प्रवास
सीपीआयएमच्या सदस्य असलेल्या वीना जॉर्ज या राज्याचे आरोग्यमंत्रीपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला पत्रकार ठरणार आहेत. वीना जॉर्ज यांचा जन्म 3 ऑगस्ट 1976 साली झाला. त्या भौतीकशास्त्रात एमएससी झाल्या आहेत. सीपीआयएमच्या सदस्य असलेल्या 45 वर्षीय वीना जॉर्ज या माकपच्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या एक कार्यकर्त्या होत्या. 


वीना जॉर्ज यांनी मल्याळम वृत्तवाहिन्या कैराळी टीव्ही, मनोरमा न्यूज  आणि रिपोर्टर टीव्ही या ठिकाणी अॅंकर म्हणून काम केलंय. टीव्ही न्यू या वाहिनीच्या त्या एक्झिक्युटिव्ह एडिटर होत्या. 


राजकारणात सक्रिय व्हायचं ठरल्यावर त्यांनी 2016 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाग घेतला आणि पथनामथिट्टा जिल्ह्यातील अरामुला मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करुन त्या निवडून आल्या. आता पुन्हा त्याच मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 7,646 मतांनी पराभव केला. 


वीना जॉर्ज यांचे पती डॉ. जॉर्ज जोसेफ हे उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक आणि मलंकारा ऑर्थोडॉक्स सिरियन चर्चचे सचिव आहेत. वीना जॉर्ज यांना दोन मुले आहेत. 


कोविडच्या यशस्वी हाताळणीबद्दल केरळच्या त्यावेळच्या आरोग्यमंत्री शैलजा यांचं कौतुक करण्यात आलं होतं. बीबीसी, द न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन या सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्रांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यामुळे शैलजा या केरळचा चेहरा बनल्या होत्या. आता त्यांना डावलून त्या ठिकाणी वीना जॉर्जना संधी देण्याचा पी विजयन यांचा निर्णय यशस्वी होतो का ते येणारा काळच सांगू शकेल.


महत्वाच्या बातम्या :