मुंबई : राहुल गांधीनी नोटाबंदी, जीएसटी, कोरोना महामारी, बेरोजगार, लसीकरणाच्या मुद्द्यावर आवाज उठलला आहे. राहुल गांधी हे पक्षातील कार्यकर्त्यांना कायम प्रोत्साहित करत असताता. मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगडमध्ये सरकार आले पण त्यांनी श्रेय कार्यकर्त्यांना दिले. राहुल गांधी हे टेलिव्हिजन लीडर नाही तर  व्हिजनरी लिडर आहे, असे युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. म्हणाले.  माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते. 


कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना ऑक्सिजनपासून औषधांपर्यंत तुटवडा जाणवला. त्यामुळे नागरिकांचे कमालीचे हाल झाले. या काळातही काही लोकं झोकून देऊन सर्वसामान्य नागरिकांना मदत करत होते. त्यामुळे देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही श्रीनिवास यांचं नाव चर्चिलं गेलं आहे.  कर्नाटक, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि झारखंडसह अनेक राज्यांमध्ये श्रीनिवास यांनी SOSIYC टीम बनवली आहे. ही टीम गरजवंतांना मदत करते. ज्यांना मदत हवी आहे ते गरजू लोक श्रीनिवास यांना टॅग करून ट्वीट करतात आणि यानंतर त्यांना लगेच मदत मिळते. याविषयी बोलताना श्रीनिवास म्हणाले, गरजूंना मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत असतो.  मग कोणत्याही राज्यातून कधीही मदतीसाठी कोणी टॅग केले तर त्याला मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. अतिथी देव भवो ही भारताची संस्कृती आहे. न्यूझिलंड हाय कमिशने मदतीसाठी आम्हाला टॅग केले. आम्ही मागे पुढे न पाहता त्यांना मदत केली. लोकांचा जीव वाचला पाहिजे हे आमचे ध्येय आहे. 



श्रीनिवास म्हणाले, वर्षभरात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर  खूप लोक एका वेळंच जेवण करत आहे. दुसऱ्या लाटेने लोकांचे प्रचंड  नुकसान केले आहे. दुसरी लाट येणार याची  कल्पना  होती. प्रशासनाने योग्य  तयारी न केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. 


कॉंग्रेस पक्ष हा विचार आहे. भाजपला जनतेने  दोनदा संधी दिली आहे. कॉंग्रेस पक्षाने आतापर्यंत जी आश्वासने दिली ती पूर्ण केली आहे. कॉंग्रेस पक्ष नेहमीच लोकांचा विचार करत आहे, त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला नक्की जनता संधी देईल, असे ही श्रीनिवास म्हणाले.