बंगळुरु : जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणारा अखेर जेरबंद झालाय. बंगळुरुच्या विशेष तपास पथकाने या हत्याकांडाचा पर्दाफाश केलाय. विशेष म्हणजे आपणच गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली त्याने न्यायालयासमोर दिलीय. परशुराम वाघमारे असे मारेकऱ्याचे नाव असून त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळालीय.


गौरी लंकेश... बंगळुरूच्या जेष्ठ महिला पत्रकार. विचारवंत आणि पुरोगामी लेखिका. बंगळुरूच्या त्यांच्या घरात घुसून मारेकऱ्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. कोणतेही पुरावे सापडत नसलेल्या या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा तपास अखेर कर्नाटक पोलिसांनी लावला. बंगळुरू एसआयटीच्या पथकाने या आव्हानात्मक खटल्याचा पर्दाफाश केला. आणि पोलिसांच्या हाती लागला गौरी लंकेश यांचा मारेकरी. परशुराम अशोक वाघमारे असं या संशयित आरोपीच नाव आहे. खरं तर त्याने स्वतः न्यायालयात खुनाची कबुली दिल्याने तोच या खुनातला आरोपी ठरलाय. त्याला कर्नाटक पोलिसांनी अटक करून 14 दिवसांची कोठडी मिळवलीय.

कोण आहे हा परशुराम वाघमारे?

परशुराम अशोक वाघमारे असं त्याचं पूर्ण नाव. वय वर्षे 26. विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्याचा तो रहिवासी. बसव नगरात त्याचं घर आहे. आईवडील दोघेही मजुरी करून घर चालवतात. आई भांडे विकते तर वडील मिळेल तिथं काम करतात.

एकुलता एक मुलगा असल्याने घरी परशुरामचे लाड व्हायचे. नावाला त्याने बीएससी डिप्लोमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. पण हिंदुत्ववादी विचाराने तो कमालीचा प्रेरीत झाला होता. हिंदुत्वासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी होती. त्यातच महाराष्ट्रातल्या अमोल काळे याच्याशी त्याचा संपर्क झाला. धर्म रक्षण्यासाठी प्रसंगी जीवही घ्यायची तयारी त्याने केली. बेळगावात डोंगरावर, रानावनात जाऊन मित्रांच्या साथीने एअरगन चालवण्याच प्रशिक्षण घेतलं आणि गौरी लंकेश यांचा काटा काढला. पण एका महिलेला मारलो याचा त्याला नंतर पश्चाताप झाला.

परशुरामची पार्श्वभूमी सुद्धा तेवढीच वादग्रस्त आहे. त्याला काही करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय होती. त्यासाठी तो सामाजिक शांतता बिघडवण्याच्या कामात व्यस्त असायचा. मशिदीवर ओम लिहिणे, मंदिरावर चाँद काढणे, स्वतःच पाकिस्तानचा झेंडा रोवून तो नंतर जाळणे अशी कृत्ये तो करायचा.

2012 साली याच सिंदगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात समाजविघातक कृत्ये केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. प्रमोद मुतालिक यांनी श्रीराम सेना काढली, तेव्हा सिंदगी तालुक्यातील श्रीराम सेनेच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी तो पार पाडायचा.

परशुराम याचं कुटुंब अत्यंत साधं, गरीब आणि कष्टकरी आहे. वडील अशोक आणि आई जानकी हा त्याचा परिवार. गेल्या काही वर्षांपासून त्याचे आईवडील रायचूर जिल्ह्यातील मानवी गावात कामासाठी वास्तव्याला आहेत. परशुराम कॉलेज शिकत असल्याने तो सिंदगी गावातच राहिला. अर्थार्जन करण्यासाठी म्हणून त्याने नेट कॅफे सुरू केला. या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तो लोकांना मिळवून द्यायचा. पण असं काही विपरीत काम करेल याची कल्पना परशुरामच्या आईवडिलांना नव्हती. गौरी लंकेश हत्या प्रकरणात परशुरामला झालेली अटक त्यांच्यासाठी धक्का होता.

परशुराम यांच्या दोन अन्य साथीदारांना सुद्धा एसआयटीने ताब्यात घेतलंय. परशुरामने चालवलेल्या बंदुकीतून गौरी लंकेश यांची हत्या झाली हे आता उघड झालंय. पण त्याच्या हाती बंदूक देऊन, त्याचा माथा भडकवणारे सूत्रधार शोधणं त्याहून जास्त महत्वाच आहे. कदाचित त्याची पाळंमुळं दाभोळकर, पानसरे हत्याकांडात रोवली गेली असावीत.