निर्मला सीतारामन कोण आहेत?
तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीत मध्यमवर्गीय कुटुंबात निर्मला यांचा 18 ऑगस्ट 1959 रोजी जन्म झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. त्यांची सारखी बदली होत असल्याने निर्मला यांचे बालपण अनेक गावांमध्ये गेलं. निर्मला यांच्या आईला पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड होती, निर्मला यांना त्यांच्याकडून तो वारसा मिळाला.
तामिळनाडूमध्ये बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीतील जेएनयू अर्थात जवाहरलाल नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि एक हुशार विद्यार्थिनी असा लौकिक त्यांनी मिळवला. परराष्ट्र संबंधात पी. एचडी पदवीही त्यांनी मिळवली.
परिवाराला काँग्रेस पक्षाचा राजकीय वारसा
आंध्र प्रदेशातील राजकीय नेते परकला प्रभाकर यांच्याशी 1986 साली निर्मला विवाहबद्ध झाल्या. प्रभाकरसुद्धा जेएनयूचे विद्यार्थी होते. विशेष म्हणजे प्रभाकर यांच्या घरात काँग्रेस पक्षाचा राजकीय वारसा चालत आलेला आहे.
त्यानंतर काही काळ त्या लंडनला स्थायिक झाल्या. पण तिथं फारकाळ रमल्या नाही आणि पुन्हा मायदेशात परत आल्या. 2003 ते 2005 दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगासाठी काम करताना त्या सुषमा स्वराज यांच्या संपर्कात आल्या.
नवरा आणि सासरचं कुटुंब काँग्रेसी विचारांचं असूनही 2006 मध्ये निर्मला भाजपात आल्या.
निर्मला सीतारामन यांची भाजपच्या प्रवक्त्या असतानाची कारकीर्द गाजली. अल्पभाषी पण तिखट प्रतिक्रियांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मात्र त्यांनी बोलणं कमी आणि काम जास्त हा फंडा अवलंबला. त्यामुळे मोदींच्या विश्वासू मंत्र्यांमध्ये त्यांची गणती होऊ लागली. आणि त्याच कष्टाचं फळ म्हणून टास्कमास्टर, बुद्धिमान आणि हुशार सितारामन यांना संरक्षण खातं मिळालं.
सितारामन यांच्यासाठी संरक्षण ही लॉटरीपेक्षा जबाबदारी जास्त आहे. सीमेपलीकडून पाकिस्तान आणि चीन रोज नव्या कुरापती काढतोय. दुसरीकडे काश्मीर गेल्या तीन वर्षांपासून धगधगतंय. अशावेळी संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सितारामन यांची कसोटी लागणार आहे.
जगभरातील 15 देशात महिला मंत्र्यांकडे संरक्षण मंत्रालय
स्वतंत्र भारताच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिलेच्या खांद्यावर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र जगभरातही विविध देशांच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदार महिला मंत्र्यांच्याच खांद्यावर आहे.
श्रीलंकेतून याची सुरुवात झाली होती. श्रीलंकेने पहिल्यांदाच 1960 साली श्रीमावो भंडारनायको यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची धुरा दिली होती. त्यानंतर 1980 साली इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. शिवाय सध्या भारतासह ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रांस, ऑस्ट्रेलिया यांच्यासह 15 देशांच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी महिलेच्या खांद्यावर आहे.
- बांगलादेश – शेख हसीना (पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री)
- फ्रान्स – फ्लोरेंस पार्ली
- स्पेन – मारिया डोलोरेस दि कोस्पेदाल
- ऑस्ट्रेलिया – मरीस ए पेन
- इटली – रॉबर्टा पिनोट्टी
- दक्षिण आफ्रिका – नॉसिव्हीव मॅपिसा
- रिपब्लिकन ऑफ मॅसिडोनिया – रादमिला सेकेरिंस्का
- स्लोव्हेनिया – एंद्रेजा कटिक
यांशिवाय नेदरलँड, निकारागुआ, केनिया, अल्बानिया, नॉर्वे आणि बॉस्निया अँड हर्जेगोव्हिना या देशांच्या संरक्षण मंत्रीपदीही महिला मंत्री आहे.
संबंधित बातम्या :