1990 साली अडवाणींची रथयात्रा रोखणारा अधिकारी मोदींच्या मंत्रिमंडळात!
एबीपी माझा वेब टीम | 03 Sep 2017 03:14 PM (IST)
मंत्रिमंडळ विस्तारात आर. के. सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. बिहारमधील आरा मतदारसंघातून खासदार असलेल्या आर. के. सिंह यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांचं नाव आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.
नवी दिल्ली : 2019 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली नवी टीम तयार केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात 9 नव्या चेहऱ्यांचा समावेश केला असून, त्यात 4 माजी अधिकारीही आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात एका अशा चेहऱ्याला संधी दिली आहे, ज्याने 1990 साली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी यांची रथयात्रा रोखली होती. त्यांचं नाव आहे आर. के. सिंह. मंत्रिमंडळ विस्तारात आर. के. सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. बिहारमधील आरा मतदारसंघातून खासदार असलेल्या आर. के. सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांचं नाव आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. आर. के. सिंह यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माजी उप-पंतप्रधान, माजी गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा मिळाला आहे. तोही एका वेगळ्या अर्थाने. आर. के. सिंह आणि लालकृष्ण अडवाणी ही दोन नावं एकत्र आली की अनेकांना 30 ऑक्टोबर 1990 ही तारीख आठवते. 1990 मध्ये ज्यावेळी अडवाणींनी राम मंदिरासाठी आंदोलन केलं. त्यावेळी अडवाणींनी सोमनाथहून रथ घेऊन अयोध्याला जात होते, त्यावेळी त्यांना बिहारमध्ये अटक करण्यात आली. अडवाणी यांना अटक करुन तुरुंगाची वाट दाखवणारा दुसरा-तिसरा कुणी नव्हता, तर ते होते आर. के. सिंह. त्यावेळी आर. के. सिंह हे समस्तीपूरचे जिल्हाधिकारी होते. अडवणींना अटक करुन रांचीच्या तुरुंगात पाठवण्यात आले आणि अशाप्रकारे आर. के. सिंह यांनी लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अयोध्येत पोहोचण्याआधीच रोखली. आर. के. सिंह हे 1975 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत आणि यूपीए सरकारच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय गृहसचिवपदही भूषवलं आहे. याच पदावरुन ते निवृत्त झाले. पी. चिदंबरम यांच्या पसंतीमुळेच त्यांना गृहसचिव बनवलं गेल्याचं म्हटलं जातं. आर. के. सिंह हे सेंट स्टीफन्स कॉलेजचे विद्यार्थी आहेत.