मुंबई : भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवार हा काळा दिवस ठरला असून सेन्सेक्स 1431 अंकांनी घसरला. तर निफ्टीही गेल्या सात महिन्यातील निचांकी पातळीवर पोहोचली असून त्यामध्ये 368 अंकांची घसरण झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच इतर देशांवर व्यापार शुल्क लादणार असल्याचं जाहीर केलं. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून येतंय. 


मंगळवार, 21 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री दिसून आली. BSE सेन्सेक्स 1431 अंकांनी घसरून 75,641.87 अंकांच्या निचांकी पातळीवर आला. त्याचवेळी निफ्टीमध्येही मोठी घसरण दिसून आली. व्यवहारादरम्यान निफ्टी सुमारे 368 अंकांनी घसरलाआणि आणि 22,977 वर पोहोचला. 


गुंतवणूकदारांच्या सात लाख कोटींचा चुराडा


दोन्ही बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी जवळपास 2 टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये आज व्यापारात प्रत्येकी 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या प्रमाणातील विक्रीमुळे गुंतवणूकदारांना सात लाख कोटींहून अधिक नुकसान झालं.  BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल हे 432 लाख कोटींवरून 425.5 लाख कोटींवर घसरल्याचं दिसून आलं.


ट्रम्प यांच्या निर्णयाचा शेअर बाजाराला फटका


अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार स्थापन झाले आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी 1 फेब्रुवारीपूर्वी कॅनडा आणि मेक्सिकोतून येणाऱ्या वस्तुंवर 25 टक्के शुल्क लागू करणार असल्याचं सांगितलं. याशिवाय चीनसह ब्रिक्स देशांवर महागडे टॅरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली असून युरोपीय देशांनीही याबाबत संकेत दिले आहेत.


परकीय गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक मागे


परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून (FPIs) सातत्याने भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेतलं जात आहे. त्याचा परिणाम हा शेअर बाजाराच्या घसरणीमध्ये दिसून येत आहे. परकीय गुंतवणूकदारांकडून एकट्या जानेवारी महिन्यात आतापर्यंत सुमारे 51,000 कोटी रुपयांची विक्री करण्यात आली आहे.


ही बातमी वाचा: