नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे सोशल मीडियावर दोन फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमधून दावा करण्यात येतोय की, राहुल गांधी पक्षाचं काम सोडून इटालियन गर्लफ्रेण्डसोबत फिरत आहेत. वेगवेगळ्या कॅप्शनसोबत हे फोटो व्हायरल केले जात आहेत.
व्हायरल होत असलेल्या एका फोटोत राहुल गांधी जेवणाच्या टेबलवर दिसत आहेत आणि दुसऱ्या फोटोत राहुल गांधी हसताना दिसत आहेत. मात्र, दोन्ही फोटोंमध्ये त्यांच्या बाजूला एक तरुणी आहे, जी इतरांशी काहीतरी बोलत आहे.
आता सोशल मीडियावर हे दोन्ही फोटो व्हायरल करणाऱ्यांचा दावा आहे की, ती तरुणी राहुल गांधी यांची इटालियन गर्लफ्रेण्ड आहे.
हे फोटो शेअर करताना काही लोकांनी असाही दावा केला आहे की, हे फोटो माजी काँग्रेस नेत्या बरखा शुक्ला यांनी व्हायरल केले आहेत.
बरखा शुक्ला यांनी हे फोटो व्हायरल केले की नाही, हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजने काही गोष्टींची पडताळणी केली. त्यात असे लक्षात आले की, याच महिन्यात बरखा शुक्ला यांची एक पत्रकार परिषद झाली होती, ज्यात त्यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच पत्रकार परिषदेत बरखा शुक्ला यांनी राहुल गांधी यांचे फोटो समोर आणले होते.
काँग्रेसने बरखा शुक्ला यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.
एबीपी न्यूजने काँग्रेसमधील सूत्रांकडून याबाबत माहिती मिळवली, त्यातून असे समोर आले की, राहुल गांधी यांचे व्हायरल होणारे हे दोन्ही फोटो याच महिन्यातील 14 एप्रिलचे आहेत. राहुल गांधी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होते आणि तिथेच ते एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये रात्रीचं जेवण करत होते.
काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्यासोबत फोटोत दिसणारे लोक इटलीतील नातेवाईक आहेत. हे सर्वजण नेहमीच भारतात ये-जा करत असतात आणि इटालियन रेस्टॉरंटमध्येच जेवणही करतात.
फोटोत दिसणारी महिला राहुल गांधी यांची गर्लफ्रेण्ड नसून मित्रपरिवारातील व्यक्ती आहे. एबीपी न्यूजच्या पडताळणीत या फोटोंमागचं सत्य समोर आले असून, राहुल गांधी इटालियन गर्लफ्रेण्डसोबत असल्याचा दावा खोटा असल्याचंही स्पष्ट झाले आहे.