चंदीगड : 2002 मधील साध्वी बलात्कार प्रकरणी ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंग यांनी स्वतः रोहतकच्या सुनारिया कारागृहात जाऊन शिक्षा ठोठावली. ही शिक्षा झाल्यानंतर आता राम रहीमकडे पर्याय काय, असा प्रश्न सर्वांना पडला असेल.


राम रहीमकडे आता शिक्षेविरोधात हायकोर्टात आव्हान देण्याचा पर्याय आहे. मात्र आजच राम रहीमला हायकोर्टात जाता येणार नाही. त्यामुळे आजची राम रहीमची रात्र तुरुंगातच निघणार आहे.

राम रहीमवर बलात्कार म्हणजे भा.दं.वि. कलम 376 नुसार आणि धमकावल्याप्रकरणी कलम 506 अंतर्गत आरोप सिद्ध झाला आहे. हे बलात्कार प्रकरण 2002 सालचं आहे. त्यामुळे दिल्लीतील 2013 सालच्या बलात्कार प्रकरणानंतर कडक करण्यात आलेल्या कायद्यानुसार राम रहीमला शिक्षा सुनावली जाणार नाही. मात्र पीडितेवर धर्मगुरुकडून अत्याचार आणि 2 महिलांवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी जास्तीत जास्त शिक्षा देण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत.

याशिवाय कलम 506 साठीही 7 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावली जाते.  न्यायाधीशांनी रोहतक जेलमध्ये जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावली. जेलमधील या न्यायालयाला सत्र न्यायालयाचा दर्जा असल्याने राम रहीमला हायकोर्टात निर्णयाला आव्हान देता येईल. निर्णयाची प्रत लगेचच राम रहीमच्या वकिलाकडे दिली जाईल. यानंतर राम रहीमचे वकील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात. दरम्यान जाणकारांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणं कठीण मानलं जातं.

राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला तरी हायकोर्ट सीबीआयची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जामीन मंजूर करणार नाही. सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागवलं जाईल. त्यानंतर पुढील सुनावणी होईल म्हणजेच ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत राम रहीमचा मुक्काम तुरुंगात असेल.

राम रहीम बाहेर येण्याची शक्यता कमीच!

हायकोर्टाकडून राम रहीमच्या याचिकेवर स्टे देखील लावला जाऊ शकतो. याला सस्पेंशन ऑफ कोर्ट असं म्हटलं जातं. त्यामुळे राम रहीमला जामीन मिळण्याची शक्यता कमीच आहे. राम रहीमला जामीन दिला तर तो भारत सोडून परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे. शिवाय राम रहीम बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा सुनावणीसाठी कोर्टात आणणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेशी खेळणं असेल, ही कारणं लक्षात घेऊन त्याला जामीन मिळण्याची शक्यता अगदीच तुरळक असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.