नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीकारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. दिल्लीतील बवाना विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. ‘आप’चे उमेदवार रामचंद्र यांचा विजय झाला आहे.
आम आदमी पक्षाने तब्बल 24 हजार मतांनी विजयाला गवसणी घातली असून, दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे.
या निवडणुकीत भाजपकडून वेदप्रकाश, आम आदमी पक्षाकडून रामचंद्र आणि काँग्रेसकडून सुरेंद्र कुमार रणांगणात होते.
भाजपचे उमेदवार वेदप्रकाश हे या मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे आमदार होते. मात्र, त्यांनी ‘आप’ला राम राम करत भाजपप्रवेश केला. त्यामुळे बवानामध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली.
दिल्ली महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर बवाना पोटनिवडणूक म्हणजे आम आदमी पक्षाची एकप्रकारे परीक्षाच होती. तर काँग्रेससाठी भरकटलेली नाव किनाऱ्यावर आणण्याची संधी होती. त्यात राजौरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर भाजपने बावनामध्ये कंबर कसली होती. मात्र, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने बवानामध्ये बाजी मारली आहे.