नवी दिल्ली: राज्यसभेत आज ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळ्याचे जोरदार पडसाद उमटले.  राज्यसभेत नियुक्त झाल्या-झाल्याच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पहिल्या भाषणात थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदीत मिळालेली लाच सोनिया गांधी यांनी घेतली, असा आरोप स्वामी यांनी केला. त्यानंतर काँग्रेस खासदारांनी वेलमध्ये उतरून जोरदार गोंधळ घातला.

 

इटलीच्या न्यायालयाने याप्रकरणात ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या प्रमुखाला शिक्षा ठोठावल्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेला आलं आहे. या कंपनीच्या प्रमुखाने या व्यवहारासाठी भारतात लाच दिल्याचा आरोप आहे.

 

महत्त्वाचं म्हणजे भारतात कोणाला लाच दिली हे अद्याप समोर आलं नसलं तरी कोर्टाने चार वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव घेतलं आहे.

 

ऑगस्टा हेलिकॉप्टर व्यवहारात लाचखोरी झाल्याचं इटलीच्या कोर्टाने मानलं आहे. या व्यवहारासाठी भारताचे माजी वायूसेना प्रमुख एस पी त्यागी यांना लाच देण्यात आली होती. मात्र या व्यवहारातील मध्यस्थ आरोपी जेम्स क्रिस्टियन मायकल मिचेलने इंग्रजी वृत्तपत्र 'द हिंदू'ला दिलेल्या माहितीनुसार, गांधी परिवाराशी आपला काहीही संबंध नाही असं म्हटलं आहे.

 

काय आहे ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळा?

 

भारतीय हवाई दलाने 2010 मध्ये इटलीच्या ऑगस्टा या कंपनीकडून 3600 कोटी रुपयात 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची खरेदीचा करार केला. ज्यावेळी हा व्यवहार झाला, त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार होतं. तर हवाई दलाचे प्रमुख एस पी त्यागी होते.

 

या व्यवहारासाठी कमीशनरुपी 10 टक्के म्हणजे सुमारे 350 कोटी रुपये लाच म्हणून देण्यात आली होती, असं सांगण्यात येतं.

 

या व्यवहारात लाचखोरी झाल्याचं 2012 मध्ये समोर आलं. घोटाळ्याच्या गदारोळानंतर 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता.

 

भारताने हा व्यवहार 'ऑगस्टा वेस्टलँड' या कंपनीसोबत केला होता आणि हेलिकॉप्टर बनवणारी कंपनीच नाव 'फिनमेक्कनिका' आहे.

 

इटलीच्या 'फिनमेक्कनिका' कंपनीने 12 ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या सौद्यापोटी माजी वायूसेना प्रमुख एस पी त्यागी यांच्यासह त्यांच्या तीन नातेवाईंकाना लाच दिल्याचा आरोप आहे.

 

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरने टेंडर मिळावं यासाठी अटी-शर्ती शिथील केल्याचाही आरोप आहे. त्यामुळेच या कंपनीला हे टेंडर मिळाल्याचं सांगण्यात येतंय. ही लाच 'फिनमेक्कनिका' कंपनीकडून दिली होती.

 

माजी वायूसेना प्रमुख एस पी त्यागी यांच्यासह त्यांच्या तीन नातेवाईंकाना लाचेची रक्कम दिल्याचा आरोप आहे.

 

लाच रक्कम थेट न देता, दोन कंपन्या 'आयडीएस ट्यूनिशिया' आणि 'आयडीएस इंडिया' यांच्या माध्यमातून देण्यात आल्या.

 

इटलीच्या कोर्टाचा ठपका

 

आता इटलीच्या कोर्टाने या संपूर्ण व्यवहारात 125 कोटी रुपयांची लाचखोरीचा प्रकार घडल्याचा ठपका ठेवला आहे. ऑगस्टा वेस्टलँड आणि 'फिनमेक्कनिका' या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी लाच दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही कंपनीच्या प्रमुखांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

सुब्रमण्यम स्वामींचा दावा

 

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या मते, या व्यवहारात झालेल्या लाचखोरीची रक्कम 55 टक्के राजकीय नेत्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे हे राजकारणी कोण या सर्वांची माहिती समोर आली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. तसंच लाचेची रक्कम भारतात न आणता, परस्पर परदेशी बँकांमध्ये ठेवल्याचाही दावा स्वामींचा आहे. स्वामींच्या मते, सोनिया गांधींनाही लाचेचा पैसा मिळाला, त्यांनी तो जिनिव्हाच्या बँकेत ठेवला आहे.

 

जेम्स मायकलची कथित चिट्ठी

 

इंग्रजी वृत्तपत्र 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या मते, ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारात मध्यस्थाची भूमिका पार पाडणारा आरोपी जेम्स मायकलने एक चिट्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत  कथित कमिशन वाटपाची माहिती दिली होती. मायकलच्या कथित चिठ्ठीनुसार, 15 ते 16 मिलियन युरो म्हणजेच सुमारे 120 कोटी रुपये 'FAM' च्या नावे देण्यात आले. मात्र FAM म्हणजे कोण याबाबतची माहिती उघड झालेली नाही.

 

मिचेलच्या कथित नोटच्या मते,8.4 मिलियन युरो म्हणजे 63 कोटी रुपये 'BUR' च्या नावे दिले. BUR म्हणजे ब्युरोक्राफ्ट अर्थात नोकरशाह होऊ शकतो. याशिवाय 'AF'ला 45 कोटी रुपये देण्यात आल्याची नोंद या कथित चिठ्ठीत आहे. एअरफोर्ससाठी 'AF' लिहिण्यात आलं आहे.  तर 'AP'ला 3 मिलियन युरो म्हणजे सुमारे 22.5 कोटी रुपये दिल्याची नोंद आहे. AP म्हणजे Politicians म्हणजे राजकारणी असू शकतो.

 

याशिवाय या कथित चिठ्ठीत मिसेज गांधींचं नाव असल्याचं सांगण्यात येतय. चिठ्ठीनुसार सोनिया व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर बदलू इच्छित होत्या. जुन्या हेलिकॉप्टरऐवजी नवी हेलिकॉप्टर्स त्यांना हवी होती. या कथित चिठ्ठीत सोनियांच्या जवळच्या सल्लागारांपैकी 7 जणांची नावं आहेत. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, अहमद पटेल, तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, वीरप्पा मोईली, ऑस्कर फर्नांडिस, एम के नारायणन आणि विनय सिंह (राहुल गांधींचे निकटवर्तीय) यांची नावं आहेत.

 

या सर्व प्रकारामुळे आता काँग्रेसचे बडे नेते आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत.