What Is A Narco Test : पोलिसांच्या थर्ड डिग्रीसमोर भले भले गुन्हेगार घडाघडा बोलायला लागतात, असं म्हटलं जातं. काही प्रमाणात हे खरं असलं तरी सगळ्याच केसेसमध्ये हा फॉर्मुला लागू होत नाही. गुन्हेगाराला खरं बोलायला भाग पाडणारं अस्त्र यावेळी उपयोगात येत, ते म्हणजे नार्को टेस्ट. याबद्दल अनेकांनी ऐकलं, वाचलं असेल. एखादा आरोपी तपासात सहकार्य करत नसेल तर पोलिसांकडून न्यायालयाकडे नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली जाते. पण ही टेस्ट कशी केली जाते? यावेळी खबरदारी काय घ्यावी लागते? या टेस्टमुळे जीवाला धोका असतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात... 


श्रद्धा वालकर हत्याप्रकरणामुळे देशभरात संताप व्याक्त करण्यात येत आहे. श्रद्धा हत्याकांडाप्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आरोपी अफताब पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही.  त्यामुळे तपास करताना पोलिसांना अडचणींचा समाना करावा लागत आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली आणि ती कोर्टाने मान्य केली. नार्को टेस्टमध्ये अफताबची क्रूरता आणि सत्य समोर येईल. पण ही नार्को टेस्ट म्हणजे काय? ती कशी केली जाते? काय खबरदारी घेतली जाते? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात... 


नार्को टेस्ट म्हणजे काय?


आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी नार्को टेस्ट केली जाते. ही चाचणी फॉरेन्सिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ इत्यादींच्या उपस्थितीत केली जाते. या चाचणीत आरोपीला काही औषधे दिली जातात, ज्यामुळे त्याचे जागृत मन सुस्त अवस्थेत जातं. त्यामुळे आरोपीच्या कानावर पडणाऱ्या गोष्टींविषयी विचार करुन उत्तर देण्याचे त्याचे कौशल्य कमी होते. काही प्रकरणांमध्ये आरोपी बेशुद्धावस्थेत जातो, तेव्हा सत्य जाणून घेता येत नाही. परंतु नार्को टेस्टमध्ये आरोपी प्रत्येक वेळी सत्य सांगतात आणि प्रकरण सोडवले जाईल असे होत नाही. बर्‍याच वेळा आरोपी अधिक हुशार असतात आणि चाचणी करणाऱ्या तपास टीमला देखील चकमा देतात.


कशी केली जाते Narco Test?
या टेस्टमध्ये आरोपीला सोडियम पेंटोथॉलचे एक इंजेक्शन दिले जातं. या औषधाला ट्रुथ ड्रग म्हणूनही ओळखले जातं. हे औषध दिल्यामुळे व्यक्ती एका वेगळ्याच अवस्थेत जातो. तो पूर्णतः शुद्धीतही असत नाही किंवा बेशुद्धही होत नाही. या स्थितीत व्यक्तीला फारसे बोलता येत नाही. असं मानले जाते की, या स्थितीत व्यक्ती खोटं बोलत नाही. त्यामुळे तपास पथकाला वस्तुस्थितीपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. यात आरोपी टेक्नीकल गोष्टींचा विचार करु शकत नाही.त्याची विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे व्यक्ती जास्त किंवा गतीने बोलू शकत नाही.



नार्को टेस्ट करण्यापूर्वी घेण्यात येणारी काळजी
१) कोणत्याही आरोपीची नार्को टेस्ट करण्यापूर्वी त्याची शारीरिक तपासणी केली जाते.
२) आरोपी व्यक्ती आजारी, वृद्ध किंवा शारीरक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्यास ही चाचणी केली जात नाही. 
३) नार्को टेस्टची औषधं आरोपीचं आरोग्य, वय आणि लिंगाच्या आधारे दिली जातात. बर्‍याच वेळा औषधाच्या जादा डोसमुळे ही चाचणी अपयशी ठरते, म्हणून ही चाचणीपूर्वी बरीच काळजी घ्यावी लागते.


नार्को टेस्टमुळे व्यक्तीचा जीव जाण्याची भीती असते का?
बर्‍याच प्रकरणांमध्ये या चाचणीदरम्यान औषधाच्या अति डोसमुळे आरोपी कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे ही चाचणी बऱ्याच विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या मदतीनेच केली जाते.