माध्यमांमध्ये कथित आरटीआयच्या आधारावर बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य नसल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र यावर आता आरबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.
बँक खात्याशी आधार कार्ड लिंक न केल्यास काय होईल?
बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी तुम्ही आधार कार्ड लिंक न केल्यास खातं बंद होईल. खातं बंद झाल्यानंतर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं तर तुमचं बँक खातं पुन्हा चालू होईल. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यानंतरच पुन्हा खातं सुरु होईल, असं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. मात्र या सर्व प्रक्रियेसाठी किती वेळ जाईल, याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही.
बँक खातं आणि आधार लिंकचं स्टेटस कसं चेक कराल?
- आधारच्या www.uidai.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला बँकिंग स्टेटस चेक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका
- सिक्युरिटी कोड टाकून सबमिट केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
- ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लिंकिंग स्टेटस दिसेल.
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुनही तुम्ही हे स्टेटस पाहू शकता
- *99*99*1# हा क्रमांक त्यासाठी डायल करावा लागेल.
- हा क्रमांक डायल केल्यानंतर आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर तो अचूक आहे का, याची खात्री करण्यासाठी ‘कंफर्म’ हा पर्याय निवडावा लागेल.
- पुढे गेल्यानंतर तुमचा आधार नंबर लिंक केलेला असेल तर स्टेटस दाखवलं जाईल.
एकाच आधार नंबरशी लिंक केलेले अनेक खाती असू शकतात. मात्र तुम्ही शेवटचं लिंक केलेलं खातं यामध्ये दाखवलं जाईल. तुम्हाला तुमच्या सर्व खात्यांची माहिती पाहिजे असेल, तर बँकेत जावं लागेल.
दरम्यान आधार कार्ड लिंक न केल्यानंतर सर्व खाती बंद होणार नाहीत. काही खात्यांना यामध्ये सूटही देण्यात आलेली आहे. मात्र याबाबत नेमकी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
बँक खात्याशी आधार कार्ड कसं लिंक कराल?
आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही एटीएमच्या माध्यमातूनही आधार कार्ड खात्याशी लिंक करु शकता. मात्र एटीएमच्या माध्यमातून शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्डची फोटोकॉपी देऊन ही प्रक्रिया करता येईल.