अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ओबीसीचे युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. 23 ऑक्टोबरला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत अल्पेश ठाकोर पक्षप्रवेश करतील.


काँग्रेसने गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार नेता हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांना सोबत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. विविध समुदायाचं समर्थन मिळाल्यामुळे पंतप्रधान मोदींचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसचं पारडं जड होणार आहे.

हार्दिक पटेलने पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे हार्दिक पटेल अगोदरपासूनच भाजपच्या विरोधात आहे. अल्पेश ठाकोरने काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे दलित चेहरा म्हणून समोर आलेल्या जिग्नेश मेवाणी यांचाही भाजप हा प्रमुख विरोधक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जेडीयूचे एकमेव आमदार छोटू भाई वसावा यांच्याशी युती करण्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. या सर्वांचा पाठिंबा मिळाल्यानंतर काँग्रेसला 182 पैकी 125 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे गुजरात अध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली नव्हती. मात्र भाजपला गुजरातमधून हद्दपार करायचं असेल तर काँग्रेसचे दरवाजे अजूनही खुले आहेत, असं भरतसिंह सोलंकी यांनी सांगितलं.