Pet Rules in Housing Society : काही लोकांना कुत्रे पाळणं आवडतं, तर काही लोक कुत्र्यामुळे नाराज दिसून येतात. कुत्र्याने हल्ला केल्याच्या काही घटनाही आपल्या कानावर येतात. अलिकडेच उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका पिटबुल कुत्र्याने एका महिलेवर हल्ला केला, ज्यामध्ये महिलेला तिचा जीव गमवावा लागला होता. कुत्र्याने चावा घेतल्याच्या किंवा कुत्र्यामुळे भांडण झाल्याच्या बातम्या अनेक वेळा तुम्ही ऐकत असाल. दरम्यान, देशात कुत्रे पाळण्याचे काय नियम आहेत आणि विशेषत: पिटबुलसारखे कुत्रे पाळण्यासंदर्भात काय नियम आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याचं उत्तर जाणून घ्या.


कुत्र्यांमुळे दरवर्षी किती लोकांचा मृत्यू?


देशात दरवर्षी किती लोकांचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू होतो, हे माहिती आहे का नसेल तर जाणून घ्या. अहवालानुसार, देशात 1 कोटीहून अधिक पाळीव कुत्रे आहेत, तर भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या सुमारे 3.5 कोटी आहे. NCRB च्या रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार, 2019 मध्ये देशात कुत्रा चावण्याच्या 4,146 घटनांमध्ये माणसांचा मृत्यू झाला. 2019, 2020, 2021 आणि 2022 मध्ये देशात किती लोकांवर कुत्र्यांनी हल्ला केला, याबाबत भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गेल्या वर्षी संसदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले होते. यानुसार, सन 2019 मध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या 72 लाख 77 हजार 523 घटनांची नोंद झाली होती, तर 2020 मध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या एकूण 46 लाख 33 हजार 493 घटनांची नोंद झाली होती. तसेच, 2021 मध्ये एकूण 17,01,133 कुत्रे चावल्याची प्रकरणे नोंदवली गेली होती.


देशात कुत्रे पाळण्याबद्दल नियम काय?


पिटबुल हा जगातील सर्वात धोकादायक प्रजातीचा कुत्रा मानला जातो आहे. ही प्रजात त्याच्या अत्यंत आक्रमक वृत्तीसाठी देखील ओळखली जाते. जगातील 41 देशांमध्ये पिटबुल जातीचा कुत्रा पाळण्यावर बंदी आहे, म्हणजेच तुम्ही या देशांमध्ये पिटबुल पाळू शकत नाही. पिटबुल हे इतर कुत्र्यांपेक्षा जास्त हिंस्र आणि अनियंत्रित असतात, ते रागावल्यावर थेट हल्ला करतात. हे हल्ले जीवघेणे असतात. पिटबुलच्या हल्ल्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये या कुत्र्यावर बंदी घालण्यात आली आहे. कुत्रे पाळण्याबद्दल देशातील प्रत्येक शहरात वेगवेगळे नियम आहेत.


देशात 'या' ठिकाणी पिटबुलवर बंदी


गाझियाबाद महानगरपालिकेने (GMC) पिट बुल, रॉटवेलर आणि डोगो अर्जेंटिनो जातीच्या कुत्र्यांवर बंदी घातली आहे. गुरुग्राममध्ये 11 परदेशी जातींवर बंदी आहे. यामध्ये अमेरिकन पिट-बुल टेरियर्स, डोगो अर्जेंटिनो, रॉटवेलर, नेपोलिटन मास्टिफ, बोअरबोएल, प्रेसा कॅनारियो, वुल्फ डॉग, बॅंडॉग, अमेरिकन बुलडॉग, फिला ब्रासिलिरो आणि केन कोर्सो या जातींचा समावेश आहे. दिल्लीमध्येही पिटबुलसारख्या काही हिंस्र जातींवर बंदी घालण्याचा विचार सुरु आहे. महाराष्ट्रात कोणत्याही जातीच्या कुत्र्यांवर बंदी नाही.