Mahua Moitra: लोकसभेत (Lok Sabha)  प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपात, महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.  नैतिकता समितीच्या चौकशीत त्या दोषी ठरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.  त्यामुळे, तीन राज्यांतील भाजपच्या विजयाने बॅकफूटवर गेलेल्या, इंडिया आघाडीला हा दुहेरी धक्का आहे का? तसेच, भाजपविरोधात इंडिया आघाडीची धार आणखी वाढणार का? या प्रश्नांनी जन्म घेतला आहे. 


अदानी समूह आणि पंतप्रधान मोदींवर टीका, उद्योजकाकडून पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप, नैतिकता समितीच्या चौकशीत दोषी आणि त्यानंतर खासदारकी रद्द हा सगळा घटनाक्रम आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची  खासदारकी रद्द होताच महुआ मोईत्रा संतापून सभागृहातून बाहेर पडल्या आणि भाजपवर वार केले. ज्यावर भाजपने पलटवार केला आहे. दुपारी लोकसभेत नैतिकता समितीचा अहवाल मांडला गेला. समितीच्या शिफारसी स्वीकरल्या गेल्यावर तृणमूलतर्फे मोईत्रांना बोलायची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र ही मागणी फेटाळली गेली. 


 मोईत्रांची रद्द झालेली खासदारकी आता राजकारणाच्या केंद्रस्थानी


तर ममता बॅनर्जींनी या कारवाईवरुन भाजपचे कान टोचले आहेत. देशात लोकशाहीची हत्या होतेय लोकशाहीची बायपास सर्जरी झालीय अशी टीका ममता बॅनर्जींनी केली आहे. तीन राज्यातल्या यशानंतर इंडिया आघाडीत बिनसलंय की काय अशी चर्चा रंगली होती.  मात्र आता महुआ मोईत्रा या युवा खासदाराच्या बडतर्फीनंतर इंडिया आघाडीला भाजपविरूद्ध लढण्यासाठी नवा मुद्दा मिळाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस  मोईत्रांची रद्द झालेली खासदारकी आता राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणर हे नक्की आहे.


राजकीय प्रवास कसा सुरू झाला?


लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये काम करताना महुआ यांना मजा येत नव्हती. त्यामुळे त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, एका वर्षातच त्यांचा काँग्रेसशी भ्रमनिरास झाला आणि 2010 मध्ये त्यांनी टीएमसीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख झपाट्याने वर चढू लागला.


टीएमसीने तिला 2016 मध्ये नादिया जिल्ह्यातील करीमपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आणि येथून महुआ विधानसभेत पोहोचल्या. टीएमसीने त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यानंतर तीन वर्षांनंतर झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून तिकीट दिले. महुआ यांनी पक्षाला निराश न करता येथून विजय मिळवला. अशा प्रकारे त्या पहिल्यांदा लोकसभेत पोहोचल्या.