West Bengal Train Accident: पश्चिम बंगालमधील (West Bengal) बांकुरामधील (Bankura) ओंडामध्ये मालगाड्यांची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत इंजिनसोबत मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे. तर मालगाडीचा मोटरमन गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे आद्रा-खरगपूर मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 


रेल्वे रुळावर आधीपासूनच उभ्या असलेल्या एका मालगाडीला दुसऱ्या मालगाडीनं टक्कर दिल्यामुळे भीषण अपघात झाला. स्थानिकांनी वेळीच मदत केल्यामुळे मोटरमनला वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान, दोन्ही मालगाड्या एकाच ट्रॅकवर कशा आल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  


पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील ओंडा येथे दोन मालगाड्यांची धडक होऊन रेल्वे अपघात झाला. यानंतर अनेक डबे रुळावरून घसरले. या घटनेत एक मोटरमन गंभीर जखमी झाला आहे. मात्र अपघातात प्लॅटफॉर्म आणि सिग्नल रुमचं मोठं नुकसान झालं आहे. रविवारी सकाळी हा अपघात झाला. ज्यामध्ये दोन मालवाहू गाड्यांच्या एका इंजिनसह 6 डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे. 


पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे आद्रा-खडगपूर शाखेवरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांकुराहून येणारी दुसरी मालगाडी ओडा रेल्वे स्थानकाजवळील लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या मागील बाजूस धडकली. मालगाडी धडकल्यानंतर एका इंजिनसह दोन मालगाड्यांचे 6 डबे रुळावरून घसरले. 


कसा झाला अपघात? 


रविवारी सकाळी बांकुराच्या ओंडा स्टेशनच्या लूप लाईनवर एक मालगाडी बिष्णुपूरच्या दिशेनं उभी होती. दरम्यान, बांकुराहून विष्णुपूरकडे जाणारी दुसरी मालगाडी लूप लाईनवरच आली. चालती मालगाडी थांबलेल्या मालगाडीच्या मागील बाजूस जाऊन धडकली. वेग जास्त असल्यानं त्याचं इंजिन दुसऱ्या मालगाडीच्या वर चढलं. यासोबतच अनेक डबेही रुळावरुन घसरले. 


दुर्घटनेबाबत माहिती मिळतचा स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तात्काळ मोटरमनला बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, बालासोर अपघाताच्या झखमा अजून ओल्या आहेत. बालासोर येथे दोन एक्सप्रेस आणि एक मालगाडी एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला होता. या अपघातात तब्बल 290 हून अधिक प्रवाशांनी आपला जीव गमावला होता. या अपघाताला अजून महिनाही उलटला नसतानाही पुन्हा एकदा असाच अपघात झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन मालवाहतूक गाड्या एकाच मार्गावर कशा आल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या तरी रेल्वेकडून या अपघाताबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.