कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं भाजपच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सातपैकी चार नगरपालिकांवर आपला दबदबा कायम राखला आहे.


यात पुजाली, मिरिक, रायगंज आणि दोमकल नगरपालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं विजय मिळला. तर गोरखा जनमुक्ती मोर्चा (GJM) ने इतर तीन महापालिकांवर विजय मिळवला आहे.

पश्चिम बंगालच्या सात महापालिकांसाठी रविवारी 14 मे रोजी मतदान झालं. यातील दुर्गम भागातल्या दार्जिलिंग, कुर्सियाग, कलिम्पोंग, मिरीकसोबतच मुर्शिदाबादचं डोमकल, दक्षिण भागातील पुजाली आणि उत्तर दिनापूरचं रायगंज आदींचा समावेश होता.

यातील दार्जिलिंग जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसने जीएनएलएफसोबत आघाडी केली होती. तर गोरखा जनमुक्ती मोर्चाने भाजपसोबत युती करुन ही निवडणूक लढवली.

या निवडणूक प्रचारादरम्यान जीजेएमनं तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. जीजेएननं आपल्याच नेत्यांना फितवल्याचा आरोप केला होता. पण आज निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयानं भाजपच्या मिशन 2019 ला मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या या विजयाने अमित शाहंच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे.

कारण नुकत्याच कांथी दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं मुसंडी मारत ही निवडणूक जिंकली. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला अजून मेहनत घ्यावी लागणार असल्याचं बोललं जात आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधून भाजपचे केवळ दोनच खासदार निवडणून आले होते. त्यामुळे अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांना 2019 च्या कामाला लागण्याचे नुकतेच आदेश दिले होते.

सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मताधिक्यात वाढ झाली असली तरी तृणमूल काँग्रेसच्या तुलनेत भाजपला म्हणावा तितका प्रभाव पाडता आलेला नाही. पश्चिम बंगालमधील 40 लोकसभेच्या जागांपैकी 34 जागांवर तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व आहे.