West Bengal Election : बंगाल आणि आसामच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. नंदीग्राममधील ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी या लक्षणीय लढतीसाठी आज मतदान पार पडलं. ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं. आज पश्चिम बंगालच्या 4 जिल्ह्यांतील 30 जागांवर मतदान पार पडलं, तर आसाममधील 13 जिल्ह्यांमधील 29 जागांवर मतदान झालं. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांच्यात हाय-व्होल्टेज निवडणूक प्रचार झाला. ममता बॅनर्जी स्वत: कित्येक दिवस नंदीग्राममध्ये राहिल्या, तर अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 84.13 टक्के मतदान झालं होतं. तर दुसऱ्या टप्प्यात 80.43 टक्के मतदान झालं.  दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 171 उमेदवारांची भवितव्य ठरणार आहे. 


आज पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. दुसऱ्या टप्प्यात  80.43% टक्के मतदान करण्यात आलं. या निवडणुकीतील हाय-व्होल्टेज लढत असलेल्या नंदीग्राममध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 80.79 % टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं आहे. अशातच दोन्ही नेते एकमेकांवर हिंसाचाराचा आरोप करत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हावडा येथे निवडणूक प्रचारादरम्यान नंदीग्रामचा उल्लेख केला. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी पराभव स्विकारला आहे, असंही मोदी म्हणाले. 


नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, "आता काही वेळापूर्वी नंदीग्राममध्ये जे काही झालं ते आपण सर्वांनी पाहिलं. त्यामुळे हे कळतंय की, ममता बॅनर्जी यांनी पराभव स्विकारला आहे. दीदी अद्याप शेवटच्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ आहे. त्यामुळे सध्या पसरत असलेल्या अफवांमध्ये कितपत सत्य आहे ते आम्हाला सांगावं. सध्या चर्चा होत आहेत की, तुम्ही अचानक आणखी एका जागेसाठी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी जात आहात. हे खरं आहे का? दीदी पहिल्यांदा नंदीग्राममध्ये गेल्या, तुम्हाला जनतेनं दाखवलं. आता तुम्ही आणखी कुठेतरी जाल, बंगालचे लोक तयार आहेत."