नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. निकाल तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात झुकला आहे, तर भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहेत. राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळत असल्याचं चित्र आहे. यासोबतच आज निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचीही जोरदार चर्चा आहे. निवडणुकीआधी त्यांनी भाजपबाबत केलेल्या दाव्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, तो आज खरा ठरताना दिसत आहे.
प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा गाठण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याचाच अर्थ भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत." "जर भाजपला यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम सोडेन," असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी यासंदर्भातील ट्वीट पिन देखील करुन ठेवलं होतं.
आता त्यांचा हा दावा खरा ठरताना दिसत असून ते हिरो ठरत आहेत. साडेचार वाजेपर्यंत आलेल्या कलांनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने 213 जागांवर आघाडी घेतली होती. तर भाजप 77 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेस 1 आणि इतर एक जागांवर पुढे आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल : प्रशांत किशोर
आपल्या या दाव्याबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, "निवडणूक आयोगाने भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण केलं. निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिकेमुळे भाजपला एवढ्या तरी जागा मिळाल्या आहेत. असा निवडणूक कार्यक्रम मी कधीही पाहिला नव्हता. निवडणूक आयोगामुळे जनतेला 45 दिवस अडचणींचा सामना करावा लागला. जी निवडणूक 10 ते 15 दिवसात पार पडली असती, निवडणूक आयोगामुळे त्यासाठी दोन महिने लागले." प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाविरोधात एकजूट व्हायला हवं, असं प्रशांत किशोर म्हणाले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार आहेत. याआधी त्यांनी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षासह अनेक पक्षांसाठी काम केलं आहे.
2012 मध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते तेव्हा प्रशांत किशोर पहिल्यांदा चर्चेत आले होते. 2011 मध्ये प्रशांत किशोर यांना तिथे निवडणूक रणनीतीकार म्हणून नियुक्त केलं होतं. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही आपल्या रणनीतीच्या जोरावर प्रशांत किशोर यांनी भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
2016 मध्ये काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांना रणनीतीकार बनवलं आणि तिथे काँग्रेसचा विजय झाला होता. अनेक दिग्गज नेत्यांनी या विजयाचं श्रेय प्रशांत किशोर यांना दिलं. यानंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही ते काँग्रेसचे रणनीतीकार होते, पण त्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षासाठी काम केलं आणि दमदार विजयाची नोंद केली. आता पुन्हा एकदा पश्चिम बंगाल निवडणुकीत त्यांची रणनीती यशस्वी ठरली.