कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे भाजपने निवडणुकीची आक्रमक तयारी केली असतानाच, रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दावा केला आहे की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल." म्हणजेच भाजपला तिहेरी आकडा गाठता येणार नाही, असं ते म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे सहयोगी म्हणून काम करणारे प्रशांत किशोर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "मीडियातील काही चॅनल्सनी भाजपचा गरजेपेक्षा जास्तच प्रचार केला आहे. पण सत्य हे आहे की पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठीच संघर्ष करावा लागेल. प्रशांत किशोर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्याने आपलं ट्वीट सेव्ह करण्याचं आवाहन करत म्हटलं की "जर भाजपची कामगिरी यापेक्षा चांगली झाली तर रणनीतीकाराचं काम सोडेन."
प्रशांत किशोर यांचं हे ट्वीट गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यानंतर आलं आहे. बंगाल दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं की, "विधानसभा निवडणुकीपर्यंत ममता बॅनर्जी एकट्या राहतील."
प्रशांत किशोर यांच्यावर भाजपचा पलटवार
दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या ट्वीटवर भाजपनेही प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपची त्सुनामी आली आहे. सरकार बनल्यानंतर या देशाला एक निवडणूक रणनीतीकार गमवावं लागेल.
प्रशांत किशोर यांच्याविरोधात नाराजीचे सूर
टीएमसीच्या अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. शुभेंदू अधिकारी यांनी पक्ष सोडल्यानंतर आणखी नाराजी दिसत आहे. हे नाराजीचे सूर प्रशांत किशोर यांच्याविरोधातील आहे. हावडाच्या शिवपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जटू लाहिडी यांनी पीके यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. लाहिडी यांनी थेट प्रशांत किशोर यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटलं आहे की ते आल्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे.
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्यासोबत करार केला आहे. प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत सक्रियरित्या काम करत आहेत. परंतु टीएमसीच्या अनेक जुन्या नेत्यांना प्रशांत किशोर यांची पद्धत पटत नाही. काही बंडखोर नेत्यांनी स्पष्टपणे प्रशांत किशोर आणि अभिषेक बॅनर्जी यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप केला आहे.