नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी, तामिळनाडू, केरळ आणि आसाम येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या दिवसापूर्वीच निवडणूक आयोगानं सदर राज्यांना काही गोष्टींबाबतचा इशारा दिला होता. सर्वाधिक महत्त्वाचा इशारा होता कोविड नियमांचं पालन करण्याबाबतचा. पण, निकालाच्या दिवशी मात्र हे चित्र बदलल्याचं दिसत असून, नियमांची पायमल्ली होत असल्याची बाब दिसत आहे. 


पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये तुलनेने मोठ्या प्रमाणात कोरोना नियमांचं उल्लंघन होत असून अखेर यामध्ये निवडणूक आयोगाला तातडीने हस्तक्षेप करावा लागला आहे. सदर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना उद्देशून निवडणूक आयोगाने एक पत्र लिहून विजयी उमेदवारांसाठी सुरु असणारा जल्लोष तातडीने थांबवण्याचे आदेश दिले. यासोबतच सदर  घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या एसएचओ आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा इशाराही निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते. 


Coronavirus in Goa : गोव्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवा; काँग्रेसची मागणी 


निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी कल हाती येण्यास सुरुवात होताच तामिळनाडूमध्ये पक्षाला आघाडी मिळत असल्याची माहिती मिळतात द्रमुकच्या कार्यालयाबाहेर समर्थकांनी गर्दी केली. इथे त्यांनी एकमेकांना मिठाई भरवण्यास सुरुवात केली. तर, तिथे आसनसोलमध्ये ही फटाके फोडत तृणमूलच्या समर्थकांनी एकच धुडगूस घातला होता. 


 


























पश्चिम बंगालमध्ये तृणमूल समर्थकांनी पक्ष आघाडीवर असल्याचं लक्षात येताच सर्व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करत मोठ्या संख्येनं विविध ठिकाणी जमत तालवाद्यांच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. देशातील विविध भागांमध्ये दिसून आलेल्या या चित्रामध्ये मास्कचा वापर करण्याचं अनेकांनीच टाळलं होतं. तर, सोशल डिस्टन्सिंग दूरदूरपर्यंत दिसत नव्हतं. देशावर कोरोनाचं संकट दिवसागणिक गडद होत असतानाच निर्देश देऊनही नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि त्यांना हाताळण्यात अपयशी ठरलेलं प्रशासन या साऱ्यामुळे हे संकट आणखी बळावण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.