West Bengal CM Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागल्याचं दिसतंय. चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी आता लवकरच मुंबईत येणार असून या भेटीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याही भेटीगाठी त्या घेणार आहेत. सोबतच काँग्रेससोबत त्यांचे संबंध बिघडलेत का याचीही चर्चा सुरु आहे. 


बंगालच्या विजयानंतर ममता दीदींना दिल्ली खुणावू लागली आहे. गोवा, त्रिपुरासारख्या छोट्या राज्यात तृणमूल पाय रोवते आहेच. पण सोबत ममतांच्या दिल्लीवाऱ्याही वाढू लागल्यात आणि त्यामुळेच की, काय काँग्रेस सोबतचे त्यांचे संबंधही काहीसे बिघडल्याचं दिसत आहे. दिल्लीत सोनिया गांधींना भेटणार की नाही, या प्रश्नावर ममता कशा भडकल्या? त्यावरुनच याची कल्पना येईल. 


काँग्रेसच्या नेत्यांवर जाळं टाकण्याची एक मालिकाच गेल्या काही दिवसांपासून तृणमूलनं सुरु केली आहे. आधी काँग्रेसच्या महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता सिंह देव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, त्यानंतर दिल्लीत काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद, हरियाणाचे काँग्रेस नेते अशोक तन्वर शिवाय जिथं काँग्रेसला जरा बरी स्थिती आहे, तिथंही ममता पोहचतायत. उदाहरणार्थ गोवा. 


त्रिपुरा, गोवा यांसारख्या छोट्या राज्यांवर लक्ष ठेवतानाच ममता अनेक काँग्रेस नाराजांनाही आपल्याकडे ओढत आहेत. त्यामुळे ममतांच्या या अभियानात काँग्रेस कमजोर करण्याचंच काम सुरु आहे का? असाही प्रश्न काहींना पडला आहे. अर्थात प्रत्येक पक्षाला आपल्या विस्ताराचा अधिकार आहे, त्यामुळे ममता आपल्या पक्षासाठी ही योजना आखत असतील तर त्यात गैर काय?


ममता बॅनर्जी लवकरच मुंबई दौऱ्यावरही येत आहेत. 30 नोव्हेंबरला बंगाल ग्लोबल समिटचा कार्यक्रम आहे. यानिमित्तानं आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार भेटणार असल्याचं ममतांनी सांगितलं आहे. ममतांच्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेसच्या काही नाराजांचा तृणमूलमध्ये प्रवेश झाला. तसं मुंबईत काही सरप्राईज प्रवेश होतात का? याचीही उत्सुकता असेल. 


ऑगस्ट महिन्यात ममतांनी पहिला मोठा दिल्ली दौरा आखला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट टाळली होती. विशेष म्हणजे संसद अधिवेशनाच्या निमित्तानं त्यावेळी शरद पवार दिल्लीत होते. पण त्यावेळी अरविंद केजरीवाल, कनिमोळी यांची भेट घेणाऱ्या ममतांनी पवारांची मात्र भेट घेतली नव्हती. तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वासाठी पवारांचंही नाव असतं. या पार्श्वभूमीवर या दोघांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे. 


ममता मुंबईसोबतच मोदींच्या वाराणसीवरही लक्ष ठेवून आहेत. लवकरच आपण वाराणसीत जाणार असल्याचं ममतांनी घोषित केलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मदत करायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ममतांप्रमाणेच केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही विस्ताराची मोठी योजना आखतोय. केजरीवाल गोवा, पंजाब, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये विस्ताराची मोठी योजना आखत आहेत. त्यामुळे आता 2024 च्या या शर्यतीत नेमकं कोण पुढे येणार आणि कोण भाजपला टक्कर देऊ शकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.