Weather Updates : देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस (Hevay Rain) सुरु आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सध्या गुजरात, आसाम, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) या महिन्यात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळं गुजरात आणि आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशाची राजधानी दिल्लीत जोरदार पाऊस पडत आहे. यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळं दिल्लीत काही भागात रस्त्यांवर पाणी साचलं होतं, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह आसपासच्या भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार दिल्लीत काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. त्या ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी आठ ते 12 किलोमीटर असू शकतो. दिल्ली हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिल्लीतील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा यलो अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे तापमानात फारसा बदल होणार नाही.
गुजरात आणि आसाममध्ये काही भागात जनजीवन विस्कळीत
गुजरात आणि आसाममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. छत्तीसगडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात वाढ होत होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, यंदा मान्सून छत्तीसगडमध्ये उशिरा दाखल झाला आहे. हिमाचल प्रदेशातही जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं गेल्या आठवड्यात दरड कोसळण्यच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं सध्या पर्यटकांची गर्दी कमी झाली आहे.
महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस
राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.