IMD Weather Updates : पुढील 24 तासात देशाच्या काही भागात पावसाची शक्यता (Rain Alert) आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशाच्या हवामानात बदल दिसून येत आहे. हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला देशात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळतील. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम (Cold Weather) आहे, त्यातच काही भागात पावसाची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये थंडीसह दाट धुक्याची चादर (Cold Wave) पाहायला मिळत आहे.
आज आणि उद्या पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज आणि उद्या देशात काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, आज जम्म काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही भागात हलक्या पावसाच्या सरी दिसून येतील, असा अंदाज आहे. यासोबतच पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्येही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दिल्लीमध्ये धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक उशिराने सुरु आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सचा देशाच्या हवामानावर परिणाम
एकापाठोपाठ तीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम पुढील एका आठवड्यात वायव्य भारतावर होण्याची शक्यता आहे. यामुळे 4 फेब्रुवारीपर्यंत जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सारख्या डोंगराळ प्रदेशांवर हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये हलक्या ते तुरळक पावसाची कोसळण्याची शक्यता आहे.
थंडीसह दाट धुक्याची चादर
वायव्य राजस्थानच्या काही भागात मंगळवारी दाट धुके पाहायला मिळाले, त्यासोबतच पूर्व उत्तर प्रदेशात दाट धुक्याची चादर दिसून आली. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात मध्यम धुके आणि दिल्लीमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. आजही या भागातील हवामान काही बदल होण्याची शक्यता नसून हवामान कायम राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
धुक्यामुळे दृष्यमानतेवर परिणाम
पंजाबमध्येही सोमवारी आणि मंगळवारी पहाटे आणि रात्री दाट धुक्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. पुढील दोन ते तीन दिवस उत्तरेकडील राज्यांच्या अनेक भागात सकाळच्या वेळी दाट धुके राहण्याची दाट शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड आणि उत्तर राजस्थान या राज्यांमध्ये धुके कायम राहील. दरम्यान, 31 जानेवारीपर्यंत देशातील विविध भागात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आयएमडीने (IMD) वर्तवली आहे.