Weather Update Today : येत्या काही दिवसात राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. पुढील पाच दिवसांत देशाच्या अनेक भागांत किमान तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 26 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, 25 फेब्रुवारी ते 1 मार्च यादरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात तुरळक आणि वेगळ्या हलक्या पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


पुढील पाच दिवस पावसाची शक्यता


भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पश्चिम हिमालयीन प्रदेशातील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, केरळमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, 26 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि 26 आणि 27 फेब्रुवारीला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गडगडाट आणि विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


महाराष्ट्रात हवामान कसं असेल?


उत्तरेत होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे पुन्हा एकदा सर्वत्र तापमान घसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. परभणीत शनिवारी 11.4 अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदविण्यात आला आहे. मागच्या तीन दिवसांपासून परभणीचे तापमान हे 13 अंशाखाली गेल आहे. फेब्रुवारी महिना शेवटचा आठवडा सुरू असुन दुपारी तापमान वाढत आहे.तर सकाळी आणि संध्याकाळी थंडी आणि दुपारच्याला गर्मी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विविध आजार ही बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजून दोन-तीन दिवस हे तापमान कमीच राहणार असल्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून पुणेकरांना चांगल्याच उन्हाच्या झळा बसत होत्या. भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई आणि ठाण्यातही किमान तापमानात किंचित घट होईल, मात्र हवामान जास्त बदल होण्याची शक्यता नाही.


राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता


राज्यात पुढील पाच दिवस म्हणजे 29 फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 29 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यातही 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत, तीन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय पावसाबरोबर गारपीट होण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या पाच जिल्ह्यात पावसाची शक्यता जास्त असेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे, असा इशारा विभागाने दिला आहे. गेल्याच आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे बहुतेक भागातील रब्बीची पिके, भाजीपाला आणि संत्रा-मोसंबीच्या बहाराला फटका बसला होता.