IMD Weather Update : देशातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा एकदा हवामान आल्हाददायक झाले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये चांगला पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, आज (शुक्रवार 15 सप्टेंबर) रोजी पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस सक्रिय होईल, तर पश्चिम भारतातही आजपासूनच पावसाच्या हालचाली दिसून येतील. त्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागांत आज म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


दिल्लीसह 'या' राज्यांमध्ये आज हवामान कसे असेल?


दिल्ली एनसीआरमध्ये (Delhi-NCR) आज शुक्रवारी (15 सप्टेंबर) सकाळपासून पाऊस सुरू आहे. पावसानंतर येथील वातावरणात अचानक बदल झाला आहे. हवामान विभागाने    दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये आज म्हणजेच शुक्रवारी (15 सप्टेंबर) आकाश ढगाळ राहील आणि दिवसभर पाऊस पडल्यानंतर वातावरण थंड होईल. याबरोबरच तापमानात घट नोंदवली जाईल. गेल्या 24 तासांत दुपारी 4 वाजता दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 106 अंकांवर नोंदवला गेला आहे, जो मध्यम श्रेणीपर्यंत पोहोचला आहे.


या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तसेच, मुसळधार पावसानेही अनेक ठिकाणी कहर केला आहे. लखनौ, बाराबंकी, मुरादाबादमध्ये मुसळधार पावसानंतर ठिकठिकाणी पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आजही यूपीमध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.  उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असताना हवामान विभागाने पुन्हा एकदा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


या राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता


जर आपण राजस्थानच्या हवामानाबद्दल बोललो तर, गेल्या 24 तासांत अनेक भागांत हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. IMD नुसार कोटा आणि उदयपूरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय ओडिशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, त्यामुळे दक्षिण ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


मुसळधार पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय जर, काही अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अशा इशाराही उत्तराखंडमधील नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Anantnag Encounter : अनंतनागमध्ये सापडला जवानाचा मृतदेह, शहीद जवानांची संख्या आता 4 वर, पोलीसांचा खबरी निघाला देशद्रोही