Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरमधून (Jammu Kashmir) अत्यंत दु:खद बातमी येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अनंतनागमध्ये आणखी एक जवान शहीद झाला आहे. अनंतनागमध्ये बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला आहे. येथील चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे. परिसरात लष्कराची शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.
पोलीसांना माहिती देणाराच निघाला देशद्रोही
सुत्रांच्या माहितीनुसार पोलीसांना गुप्त माहिती देणारा खबरी देशद्रोही निघाल्याने चार अधिकाऱ्यांच्या हौतात्म्य देशाला भोगावे लागले आहे. लष्कर आणि पोलीस येत असताना या गुप्तचराने दहशतवाद्यांना टीप दिली होती. तसेच भारतीय लष्कराची टीम कशी आणि कोणत्या संख्येने येत आहे, हे त्याने दहशतवाद्यांना सांगितले होते. तो पोलिसांचा खबरी नव्हता तर दहशतवाद्यांचा गुप्तचर होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे म्हणजे सापळा रचून हल्ला करण्यात आला.
शहीद जवानांची संख्या आता 4 वर पोहचली
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरू आहे. घनदाट जंगलात ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. या चकमकीत आतापर्यंत 5 जवान जखमी झाले आहेत. तर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अनंतनागमध्ये बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला आहे, तर शहीद जवानांची संख्या आता 4 वर पोहचली आहे.
घनदाट जंगलात लष्कराकडून कारवाई सुरू
भारतीय लष्कराचे जवान अनंतनागच्या पीर पंजाल भागात दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवत आहेत. 4300 किलोमीटर परिसरात पसरलेला हा डोंगराळ भाग दहशतवाद्यांसाठी लपण्याचे ठिकाण आहे. शोध मोहिमेत या भागातील घनदाट जंगले आणि उंच टेकड्या हे भारतीय लष्करासाठी आव्हान बनले आहेत.
13 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत तीन अधिकारी शहीद झाले होते.
कर्नल मनप्रीत सिंग
कमांडिंग ऑफिसर, 19 राष्ट्रीय रायफल्स
वय- 41 वर्षे
मेजर आशिष धौनचक
19 राष्ट्रीय रायफल्स
वय- 36 वर्षे
हुमायून मुझम्मिल भट्ट
शहीद डीएसपी, जम्मू काश्मीर पोलिस
वय- 29 वर्षे
जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता
चार अधिकारी शहीद झालेल्या काश्मीरच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. या जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. हे दहशतवादी द रेझिस्टन्स फ्रंट म्हणजेच टीआरएफशी संबंधित आहेत. या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव उझैर खान असल्याचे सांगण्यात येत आहे. उझैर खानचा लष्कर प्रमुख हाफिज सईदशी थेट संबंध आहे.
अनंतनागच्या कोकरनागमध्ये अजूनही चकमक सुरूच
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरूच आहे. बुधवारी सकाळी सुरू झालेल्या चकमकीत दोन लष्कर अधिकारी आणि एक जम्मू-काश्मीर पोलिस अधिकारी शहीद झाले होती, तर गुरुवारीही दोन जवान जखमी झाल्याने लष्कराच्या जखमींची एकूण संख्या 5 वर पोहोचली आहे. तर शहीद झालेल्या जवानांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी चकमक परिसरात स्थानिक दहशतवादी उझैर खान आणि एक विदेशी दहशतवादी या ठिकाणी असल्याची पुष्टी केली आहे. या ऑपरेशनला जास्त वेळ लागण्याचीही शक्यता आहे. सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे असले तरी अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.