IMD Weather Update Today : आज देशात विविध ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, दक्षिण भारतात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात तमिळनाडू किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
हिवाळ्यातही पावसाची रिमझिम सुरुच
बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे बुधवारपर्यंत संपूर्ण दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मंगळवारी संपूर्ण उत्तर भारत आणि लगतच्या भागात वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे 9 जानेवारी रोजी जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
वायव्य भारत आणि मध्य भारताच्या मैदानी भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तर मैदानी प्रदेशासह ईशान्य भारतात अनेक दिवस दाट ते दाट धुके पडण्याची शक्यता आहे. आज 9 जानेवारीला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता
अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख, पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात, कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भातही आज विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, तेलंगणा आणि रायलसीमा या भागातही हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. उत्तर भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि ईशान्य भारतातील अनेक ठिकाणी सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. दाट धुक्यामुळे उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतामध्ये हवेचे गुण खूपच खराब असण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात हवेची गुणवत्ता घसरण्याची शक्यता आहे.
दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट कायम
दिल्लीसह उत्तर भारत अजूनही थंडीची लाट कायम आहे. उत्तर प्रदेशात अनेक भागांमध्ये किमान तापमान विक्रमी नीचांकी नोंद झाली आहे. सर्वत्र दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे, यामुळे दृष्यमानता कमी झाली असून अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. दरम्यान दिल्लीत सोमवारी महिन्यातील सर्वात थंड दिवस नोंदवला गेला आहे. दिल्लीतील किमान तापमान 5.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते, जे या हंगामाच्या सरासरी तापमनापेक्षा दोन अंशांनी कमी आहे.