India Weather Update: सध्या देशभरातील अनेक राज्यांमध्ये पावसाने (Rain) हजेरी लावल्यानंतर हवामानात बदल झाला आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातल्याने लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये आज (16 सप्टेंबर) पावसाचा अलर्ट जारी केला आहे. दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशसाठी देखील हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे, तिथेही पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
नवी दिल्लीत आज तुरळक पावसाचा अंदाज
हवामान खात्यानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तापमानाबद्दल बोलायचं झालं तर, दिल्लीत कमाल तापमान 33 अंश आणि किमान तापमान 25 अंश असणं अपेक्षित आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिल्लीत ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, गुजरातलाही पावसाचा अलर्ट
हवामान खात्याने महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक भागांत पावसाचा इशारा दिला आहे. 17 सप्टेंबरपर्यंत राज्यांच्या विविध ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुण्याच्या घाट परिसरासह उत्तर महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, पुणे, विदर्भातील वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील उर्वरित सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये देखील आज पाऊस
उत्तर प्रदेशच्या विविध भागातही पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील हवामान बदललं. त्यामुळे आजही हवामान खात्याने उत्तर प्रदेशमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या अनेक भागांत आज मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
उत्तराखंडमधील 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
उत्तराखंडमध्येही पाऊस झाल्याने लोकांना ऊन आणि दमट उकाड्यापासून दिलासा मिळाला. आजही उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. एवढंच नाही, तर उत्तराखंडमधील 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस देशातील काही भागांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा:
Weather Update: आज संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांत बरसणार कोसळधारा