Weather Update : देशात दिल्लीसह (Delhi) उत्तर भारतात पुन्हा हवामान बदलणार आहे. हिवाळा चालू असला तरी, देशातील काही भागात पावसाची आशा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD) पावसासोबत गारपीट होण्याचीही शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशात महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. येत्या तीन ते चार दिवसांत हवामानात बदल होईल, असा अंदाज आहे. जोरदार वारे देखील वाहू शकतात. त्याचा परिणाम दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे आकाश निरभ्र आहे. अनेक दिवसांपासून सूर्य तळपत आहे. उन्हाचा तडाखाही वाढला आहे. मात्र, सकाळ-संध्याकाळ अजूनही थंडी जाणवत आहे.


 


25, 26 फेब्रुवारीला विदर्भ-मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील अकोला आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


 


मुंबई, पुण्यात कसं असेल हवामान?


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, पुण्यात तसं कोरडं हवामान पाहायला मिळेल, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे शेती धोक्यात येऊ शकते. यामुळे बळीराजा चिंतेत आहे.



'या' भागात तुरळक हलका पाऊस आणि बर्फवृष्टी


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत पश्चिम हिमालयीन भागात तुरळक हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. त्याच वेळी, अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर झारखंड आणि बिहारच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो.



तुरळक ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव शक्य


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर मध्य प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स पाहता, 24 आणि 27 फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात तुरळक ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव शक्य आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. 


 


जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद 


जम्मू-काश्मीरच्या वरच्या भागात बर्फवृष्टीची प्रक्रिया थांबत नाहीये. या हिमवृष्टीमुळे आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. हिमवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील अनेक रस्ते बंद झाले आहेत. 21 फेब्रुवारीला प्रचंड बर्फवृष्टी झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग 44 वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे सांगण्यात आले.


 


हेही वाचा>>>


राज्यातील वातावरणात बदल, थंडी राहणार की जाणार? कसं असेल वातावरण? सविस्तर माहिती एका क्लिकवर