Weather Update Today : आज नवीन वर्षाच्या (Happy New Year 2024) पहिल्या दिवशी तापमानात (Temperature) आणखी होण्याचा घट अंदाज आहे. पूर्वेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे गारठा वाढला आहे. उत्तर भारतात सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील भागात थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी कायम राहणार आहे.


नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवामान कसं असेल?


देशासह राज्यातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं ढगाळ हवामान तर कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशासह राज्यातील हवामान नेमकं कसं असेल, हे जाणून घ्या.


दिल्लीत थंडीचा कडाका वाढला 


दिल्लीत रविवारी सकाळी 5 अंश सेल्सियस तापमान पाहायला मिळालं. पहाटेपासून सूर्यकिरणे पाहायला मिळाली नाही. दिल्लीत रविवार मोसमातील थंड दिवस होता. वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. वातावरणात दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.


'या' भागात पावसाची शक्यता


वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यातील हवामानावर परिणाम होताना पाहायला मिळणार आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट कायम असून थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. देशाच्या दक्षिणेकडे मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या देशातील बहुतेक भागात कडाक्याची थंडी सुरू आहे. पहाटेच्या धुक्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील दोन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रात हवामान कसं असेल?


महाराष्ट्रात मराठवाडा वगळता कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील 17 तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण 22 जिल्ह्यात 1 ते 7 जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकते. या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ पावसाची देखील शक्यता असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे.