Weather Update : संपूर्ण देशात मान्सूनचे (Monsoon) आगमन झालं आहे. त्यामुळं सध्या देशातील विविध राज्यात पाऊस पडत आहे. विशेषत: उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस म्हणजे 8 जुलैपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
कुठे कुठे पावसाचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात 5 आणि 6 जुलैला, गुजरातमध्ये 7 जुलैला पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यामध्ये आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल तसेच सिक्कीम, तामिळनाडू, पुडुचेरीत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशा राज्यात 6 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
झारखंडसह राजस्थान आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे 6 ते 8 जुलै, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 5 आणि 6 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच 7 ते 8 जुलै रोजी झारखंड आणि पश्चिम राजस्थान तसेच गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, छत्तीसगड, उप-हिमाचल पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दिल्लीत पावसाची अंदाज
मान्सून सुरु झाल्यापासून दिल्लीत सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यातही दिल्लीत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसानंतर काही भागात रस्त्यांवर पाणी तुंबले आहे. त्यामुळं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture News : आत्तापर्यंत राज्यात 20.60 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, दुष्काळ निवारणासह खरीपा संदर्भास बैठक